जनकल्याण समितीने केली अनाथ लेकरांची दिवाळी गोड

जनकल्याण समितीने केली अनाथ लेकरांची दिवाळी गोड

येवला : पुढारी वृत्तसेवा

एकीकडे झगमगाट असणाऱ्या दुनियेत कौटुंबिक ओलाव्याचा प्रकाश धूसर झाल्याचे चित्र असतांना मात्र कुटुंबापासून दुरावलेल्या अनाथ मुले व ज्येष्ठ नागरिकांची दिवाळी गोड करण्यासाठी  येवल्यातील जनकल्याण सेवा समितीच्या सदस्यांनी लासलगाव येथील जय जनार्दन बाल अनाथ व वृद्धश्रमात जाऊन तेथील अनाथ मुले व वृद्धांसोबत दिवाळी साजरी केली. या निमित्ताने तेथील ज्येष्ठ महिला भगिनींना भाऊबीजेची साडी चोळी भेट देण्यात आली.  अनाथ मुलांना फटाके व खाऊचे वाटप करण्यात आले.

सामाजिक बांधिलकी जपणारे जनकल्याण सेवा समितीची नारायणमामा शिंदे यांच्या संकल्पनेतून गेल्या २२ वर्षांपासून आदिवासी वाड्या पाड्यावर जाऊन येथील गोरगरीबांसोबत, अनाथ आश्रम व वृद्धाश्रमातील निराधारांसोबत नियमितपणे दिवाळी साजरी केली जात आहे.  

ह्यावर्षी समितीचे सदस्य सुरजमल काबरा, सुदाम दाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच उपाध्यक्ष दिगंबर कुलकर्णी, किशोर कुमावत, विजय पोंदे, सुधाकर भांबारे, शशिकांत मालपुरे, लक्ष्मन देवरे, गोविंदा शिंदे, राजेंद्र ताठे या सदस्यांच्या सहकार्याने आश्रमातील अनाथ मुले व ज्येष्ठ नागरिकांबरोबर मिष्टान्न भोजनाचा आस्वाद घेत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. आश्रमातील  ज्येष्ठ महिला भगिनींनी उपस्थित सदस्यांचे औक्षण करत ओवाळले तर सदस्यांनी त्यांना साडी चोळी भेट देऊन भाऊबीज साजरी केली. कुटुंबापासून दूर असलेल्या निराधारांना दिवाळीनिमित्तचे हे कौतुक डोळ्यांत आनंदाश्रू देऊन गेले.

अनाथ आश्रमात मुलांना दिले जाणारे संस्कार व येथील ज्येष्ठांची घेतली जाणारी काळजी याबाबत समितीची अध्यक्ष नारायणमामा शिंदे यांनी कौतुक करत मनोतत व्यक्त केले. तर आश्रमातील मुलांसाठी नारायणमामा यांच्या रूपाने खऱ्या अर्थाने मामाचे प्रेम मिळाले आश्रमाच्या व्यवस्थापिका श्रीमती संगीता ताई, दिलीप गुंजाळ यांनी आयोजकांचे आभार व्यक्त केले.
थोडे नवीन जरा जुने