येवल्यातील एस एस मोबाईल शोरुम फोडत चोरट्यांनी मोबाईल व 1लाखांची रोख रक्कम चोरली घटना
सीसीटीव्हीच्या मदतीमुळे मोठ्या चोरीचा प्रयत्न फसला
पोलिसांची डायल 112 आपत्कालीन सेवा कुचकामी
येवला : पुढारी वृत्तसेवा
एकीकडे दिवाळीची धामधूम सुरू असताना दुसरीकडे येवला शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला . नगर मनमाड राज्य महामार्गावरील प्रसिध्द साखळी समूहाचे एस एस मोबाईल हे दुकान पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी फोडत दुकानातील अंदाजे 1 लाख रुपये व एक कोटी रुपये किमतीचे आयफोन सॅमसंग रेडमी ओपो विवो या ब्रँडचे शंभराहून अधिक मोबाईल चोरी करण्याचा प्रयत्न केला. ही चोरी करत असताना सीसीटीव्हीवर सेंसर द्वारे अलार्म वाजल्याने दुकानाचे स्थानिक मालक सुदर्शन खिल्लारे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ 112 या आपत्कालीन नंबर वर कॉल केला मात्र निष्काळजी पोलीस वेळीच घटनास्थळी दाखल होऊ शकले नाही .
यावेळी दुकानाचे स्थानिक संचालक सुदर्शन खिल्लारे यांनी स्वतःच आपल्या दुकानात चोरी सुरू असताना चार किलोमीटर वरून आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेत दुकानावरती धाव घेतली अन चोरट्यांचा प्रतिकार केला, या प्रतिकारात झटापट झाल्यानंतर त्यांच्या पायाला इजा झाली . दरम्यान चोरट्यांनी प्रतिकार पाहून चोरी केलेला मुद्देमाल तिथेच टाकून पळ काढला .
यावेळी चोरट्यांनी खिशात सोबत घेतलेली रोख रक्कम अंदाजे एक लाख रुपये व दोन महागडे डेमो फोन असा ऐकून एक लाख 58 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे . या घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या सह पोलीस निरीक्षक धीरज महाजन , पीएसआय बोरसे आदींनी तातडीने घटनास्थळी भेट दिली असून सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे पोलीस आता आरोपींचा शोध घेत आहे दरम्यान एक संशयित येवल्यातील गुन्हेगार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
दरम्यान या घटनास्थळाच्या परिसरात दोन मोठे पेट्रोल पंप असून अवघ्या पाचशे फुटावर असलेल्या विंचूर चौफुलीवर पोलीस असतात. तरीही 112 नंबर वर कॉल करून सुद्धा प्रत्यक्ष दुकान मालकाला सुमारे चार किलोमीटर वरून येत आपले दुकानाची चोरी रोखण्याचा प्रयत्न करावा लागला. त्यामुळे पोलीस दल करते काय असा संतप्त सवाल जनतेमध्ये विचारला जात आहे.