जगदंबा मातेच्या चरणी पहिल्याच दिवशी हजारों भाविक लीन!
रमेशगिरी महाराजांच्या हस्ते घटस्थापना, हजारांवर भाविक बसले घटी
येवला : पुढारी वृत्तसेवा
राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येवला तालुक्यातील कोटमगाव येथील जगदंबा मातेच्या चरणी नवरात्राच्या पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी आपली हजेरी लावली. पहाटेपासूनच येवला ते कोटमगाव रस्ता भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता.दरम्यान गुरुवारी सकाळी राष्ट्रसंत सद्गगुरू जनार्दन महाराजांचे शिष्य कोपरगाव बेट येथील रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते येथे विधिवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली.
नवसाला पावणाऱ्या श्रीमहाकाली,
श्रीमहालक्ष्मी,श्रीमहासरस्वतीचे रूप असलेल्या जगदंबा माता यात्रेला आज घटस्थापना करून सुरुवात झाली.पहिल्याच दिवशी सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.नवरात्रोत्सवात नऊ दिवस येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात.आज पहिल्याच दिवशी देवी भक्तांनी दर्शनाला गर्दी केली होती.नाशिक, छत्रपती संभाजीनगर,धुळे,जळगाव व नगर जिल्ह्यासह इतरत्रचे भाविक मंदिराच्या आवारातील ग्रामपंचायत,ट्रस्ट तसेच मंदिर,सामाजिक सभागृहात सुमारे दोन हजार भाविक घटी बसले आहेत.
गुरुवारी सकाळी सकाळी मंदिराच्या आवारात घटस्थापना करून राष्ट्रसंत जनार्दन स्वामींचे शिष्य रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.यावेळी जगदंबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी पौरोहित्य रवींद्र जोशी यांनी केले. मंत्रांच्या नाम घोष यामध्ये जगदंबा मातेचा जागर करण्यात आला
याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब कोटमे, भाऊसाहेब आदमाने, व्यवस्थापक राजेंद्र कोटमे यांच्यासह ग्रामस्थ व यात्रेकरू मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान मंदिर परिसर सुशोभित करण्यात आला असून मंदिरावर आकर्षक रोषनाई करण्यात आली आहे तसेच मूर्तीला दररोज विविध रंगातील पैठनी साडी देखील परिधान केल्या जाणार आहेत.
गेल्या अनेक वर्षांची परंपरा जपत येथील
जगदंबा सेवाभावी मंडळाच्या वतीने शहरातील पहाड गल्लीतून कोटमगाव येथील जगदंबा मातेच्या पादुकांची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.मिरवणुकीत डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन मातेचा जयजयकार करण्यात आला.
कोटमगाव येथे नऊ दिवस लाखो भाविकांची गर्दी होत असल्याने विविध दुकानांनी यात्रा सजली असून रहाटपाळणे, सौंदर्यप्रसाधने,छोटे खेळ,मिठाई,हॉटेल्स आदीची दुकाने थाटली आहे.नवसाला पावणारी देवी अशीही ख्याती असल्याने नवसपूर्ती करणाऱ्यांची संख्याही अधिक असते.घटी बसन्यासह साडी-चोळी, पैठणी परिधान करून,दान करून नवसपूर्ती केली जाते.रोख स्वरूपातही अनेक जण दान करतात.याशिवाय देवीपुढे उलटे टांगून घेत नवसपूर्ती करण्याचीही परंपरा होती.मात्र ही परंपरा काही वर्षापासून बंद करण्यात आली आहे.असे असले तरी नवसाला पावणारी माता अशी श्रद्धा असल्याने अनेक भाविक विविध मार्गाने नवसपूर्ती करत असतात.तसेच वर्षानुवर्षे येथे घटी बसणाऱ्यांची संख्याही मोठी असून सलग पंधरा-वीस वर्षे घरी बसणारे हे अनेक भाविक यंदाही पुन्हा घटी बसल्याचे सांगण्यात आले.मंदिर परिसरात रोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी नऊ वाजता विविध मान्यवरांच्या हस्ते आरतीचेही नियोजन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
"जगदंबा मातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक येणार असल्याने ट्रस्ट व ग्रामपंचायतने पाणी,स्वच्छता,आरोग्य सुविधा,दर्शन,
दुकानांची मांडणी,सुरक्षा व्यवस्था आदिचे चोख नियोजन केले आहे.घटी बसणाऱ्या भाविकांसाठी देखील सुविधा उपलब्ध केल्या असून रोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे.यात्रा उत्साहात व व्यवस्थित पार पाडण्यासाठी सर्व ग्रामस्थांचे व विश्वस्तांचे सहकार्य मिळत आहे."
- रावसाहेब कोटमे,अध्यक्ष,जगदंबा देवस्थान ट्रस्ट,कोटमगाव
फोटो
कोटमगाव : येथे नवरात्रोत्सवानिमित्त जगदंबा मातेच्या मंदिर परिसरात घटस्थापना करताना रमेशगिरी महाराज. समवेत पदाधिकारी.