येवला दुष्काळी नाही तर सुकाळी तालुका म्हणून ओळखला जाईल - मंत्री छगन भुजबळ

 येवला दुष्काळी नाही तर सुकाळी तालुका म्हणून ओळखला जाईल - मंत्री छगन भुजबळ


येवला : पुढारी वृत्तसेवा

 सतत दुष्काळाच्या छायेत असलेल्या येवल्यातील उत्तर पूर्व भागाला जलसंजीवनी देण्यासाठी ममदापूर व देवना साठवण तलाव हे अतिशय महत्वपूर्ण प्रकल्प आहे. या प्रकल्पांचे काम एक वर्षाच्या कालावधीत पूर्ण करावे. पुढील काळात येवला हा दुष्काळी नाही तर सुकाळी तालुका म्हणून ओळखला जाईल असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.


मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते  ममदापूर येथे साठवण तलावाचे भूमिपूजन करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जलसंधारण विभागाचे सहसचिव हरिभाऊ गीते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे,अरुण थोरात, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, जलचिंतन सेलचे अध्यक्ष मोहन शेलार, प्रा.ज्ञानेश्वर दराडे, मच्छिंद्र थोरात, दत्तात्रय वैद्य, सयाजी गुडघे ,दत्तू वाघ, बाबुराव सोमासे, प्रकाश गोराणे, कचरू पाटील वनसे, आबा केरे, मकरंद सोनवणे, बाळासाहेब दाने, भागिनाथ पगारे, गोरख वैद्य, सरपंच विठाबाई सदगिर, संपत वाघ, गोटू मांजरे, सचिन सोनवणे, विजय जेजुरकर, नवनाथ थोरात यांच्यासह मेळाचा बंधारा कृती समितीचे सर्व सदस्य व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.


यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, ममदापुर साठवण तलाव मेळाचा बंधारा हा प्रकल्प १५ कोटी ७४ निधीतून साकारण्यात येत आहे.येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भाग हा सतत दुष्काळग्रस्त असल्याने या ठिकाणची सिंचन क्षमता अधिक वाढविण्यासाठी हा प्रकल्प अतिशय महत्वाचा असल्याने विशेष आनंद होत आहे.
सन २०१७ मध्ये् कार्यारंभ आदेश दिलेले होते. मात्र हा प्रकल्प ममदापूर राखीव संवर्धन क्षेत्रात येत असून वनविभागाच्या २८.०६ हेक्टर जागेवर साकारला जाणार असल्याने राज्य आणि केंद्रीय वने व पर्यावरण विभागाच्या विविध परवानग्यांअभावी हे काम सुरू होऊ शकले नव्हते. 


ते म्हणाले की, राज्य वन्यजीव मंडळ, राष्ट्रीय वन्यजीव मंडळा स्थायी समिती, केंद्र शासनाचा वने आणि पर्यावरण विभाग आदी विभागासह विविध मान्यतांसाठी जलसंधारण विभागाकडून प्रयत्न सुरू होते. केंद्र शासनाच्या वने आणि पर्यावरण विभागाची मान्यता आदी विविध मान्यतांसाठी जलसंधारण विभागाकडून प्रयत्न सुरू होते.दि २३ मे २०२२ रोजी केंद्रीय वने व पर्यावरण विभागाने या प्रकल्पाला दि ६ मे २०२२ मधील मार्गदर्शक सुचनांच्या अधीन राहून मान्यता दिली. त्यानंतर जलसंधारण विभागाने विविध अटींची पूर्तता करून नागपूर येथील केंद्र शासनाच्या विभागीय अधिकार प्रधान समितीकडे प्रस्ताव पाठवला होता. दि.१२ सप्टेंबर २०२२ रोजीच्या बैठकीत या समितीने ममदापुर राखीव संवर्धन क्षेत्रातील या साठवण तलावाच्या स्टेज- १ जमीन वळतीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. जलसंधारण विभागाने विविध अटींची पूर्तता करून नागपूर येथील केंद्र शासनाच्या विभागीय अधिकार प्रधान समितीकडे प्रस्ताव पाठवला होता. दि. २० सप्टेंबर २०२४ रोजी केंद्रीय वने व पर्यावरण विभागाकडून स्टेज -2 अंतिम मंजुरी प्राप्त  ममदापुर मेळाचा साठवण बंधारा हा २८.०६ हेक्टर वनजमिनीवर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.


या तलावाचे पाणलोट क्षेत्र १८ चौरस किलोमीटर आणि एकूण क्षमता ही ३५.६७ द.ल.घ.फु इतकी असणार आहे. या धरणाची लांबी २२० मीटर तर सांडव्याची लांबी ही ७९ मीटर इतकी प्रस्तावित आहे.  बंधाऱ्यामुळे ममदापूर परिसरातील जमीन ओलिताखाली येणार असून शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार असून साठवण तलावाचा ममदापूर राखीव संवर्धन क्षेत्रातील वन्य जीव आणि प्राण्यांनाही पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होणार असल्याचे त्यांनी सांगितले.


ते म्हणाले की, देवना साठवण तलाव १५ कोटी ६५ लाख निधीतून साकारला जात आहे. सतत दुष्काळाच्या छायेत असणाऱ्या येवला तालुक्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी तसेच तालुक्याची सिंचन क्षमता वाढविण्यात येत आहे. त्यापैकी येवला तालुक्यातील महत्वपूर्ण योजना देवना साठवण तलाव आहे. देवना साठवण तलाव ही येवला तालुक्यात खरवंडी व देवदरी गावाच्या जवळ दोन मोठ्या नाल्यांच्या संगमावर असून येवला तालुक्यातील देवदरी,खरवंडी,राहडी,कोळम खु.,या गावाच्या शिवारातील शेतीस उपसा पद्धतीने सिंचनाचा लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.


ते म्हणाले की या प्रकल्पामुळे वन्य प्राण्यांच्या पिण्यासाठी व रोपवाटीकेसही लाभ होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून  २.०८ दलघमी म्हणजेच ७३.४४दलघफू पाणी वापरासाठी पाणी उपलब्धता उपलब्ध होणार आहे.  या योजनेसाठी संयुक्त मोजणीनुसार वैजापूर तालुक्यातील १३.०० हेक्टर व येवला तालुक्यातील ४४.०० हेक्टर अशी एकूण ५७.०० हेक्टर क्षेत्र संपादित होत आहे. त्यापैकी ५५.७५ हेक्टर वनक्षेत्र असून १.२५ हेक्टर क्षेत्र हे खाजगी आहे. योजनेच्या बुडीत क्षेत्रापैकी ५७ हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


लवकरच मतदारसंघातील १०० टक्के नागरिकांच्या घरात नळाद्वारे पिण्याचे पाणी


येवला मतदारसंघात येवला ३८ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, लासलगाव विंचूरसह १६ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना राबविण्यात आलेल्या आहे. आता राजापूर सह ४१ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, धुळगावसह १७ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना यासह जलजीवन मिशन अंतर्गत विविध पिण्याच्या पाण्याच्या योजना राबविण्यात येत आहे या पाणी योजनाचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच मतदारसंघातील १०० टक्के नागरिकांना आपल्या घरात नळाद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध होईल. त्यामुळे आगामी काळात येवला हा दुष्काळी नाही तर सुकाळी तालुका म्हणून ओळखला जाईल असे मंत्री छगन भुजबळ यांनी या प्रसंगी सांगितले.


पिण्याच्या आणि सिंचनाच्या प्रकल्पाबाबत आडकाठी आणून राजकारण नको

येवला तालुक्याला दुष्काळी तालुका म्हणून ओळख आहे. ही ओळख पुसण्यासाठी आपण मतदारसंघात पिण्याच्या पाण्याचे व सिंचनाचे अनेक प्रकल्प राबवित आहे. मात्र जनतेच्या हितासाठी सुरू असलेल्या या कामांमध्ये काही लोक नाहक राजकारण करत आहे. या पिण्याच्या पाण्यात राजकारण कशाला असा सवाल उपस्थित करत चांगल्या कामात अडथळा कशासाठी निर्माण केला जातोय अशी विरोधकांवर टीका त्यांनी केली.

रस्त्याचे भूमिपूजन

तत्पूर्वी मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ममदापूर ते लंबे वस्ती या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. मुख्यमंत्री ग्राम सडक (टप्पा दोन) योजनेअंतर्गत या रस्त्याचे काम होणार आहे.
थोडे नवीन जरा जुने