येवला शहरात दिवाळीची लगबग
धडपड मंचने बनवलेला भव्य आकाश कंदील वेधतोय लक्ष
येवला : पुढारी वृत्तसेवा
मांगल्याचे प्रतिक असणारा दीपावली हा सण दीपोत्सवाने उजळून टाकला जातो. दीपावलीच्या काळात घरासह अंगण आणि परिसर उजळून प्रकाशमय करण्याचा सर्वांचाच प्रयत्न असतो. येथील धडपड मंचच्या वतीने दरवर्षी शहरातील मेनरोडवर मध्यवर्ती भागात लावलेला आकर्षक असा भव्य आकाश कंदील सर्वांचे लक्ष वेधुन घेत आहे.
दिवाळीची रोषणाई खऱ्या अर्थाने जाणवते ती आकाश कंदील द्वारे. आकाशकंदीलांतून पडणाऱ्या प्रकाशाने घराचे अंगण उजळून जाते यासाठी दीपावलीच्या दिवसात घरोघरी आपापल्या परीने आकाश कंदील लावला जातो. परंतु घरासोबत शहराचे देखील सौंदर्यात भर पडावी यासाठी गेल्या पंधरा वर्षांपासून येथील धडपड मंचच्या वतीने शहरातील मेनरोडवर भव्य आकर्षक असा आकाश कंदील लावला जातो.
तसेच धडपड मंचच्या वतीने शहरातील बालाजी गल्ली येथे तर जब्रेश्वर मंडळाच्या वतीने कापड बाजारात रोशनाई करण्यात आली असल्याने वातावरणात चैतन्य निर्माण झाले आहे. भव्य आकाशकंदील तसेच शहरातील मुख्य वेशीवर लावलेली शुभेच्छा कमानीने शहराच्या सौदर्यात भर टाकली आहे. सौंदर्यात्मक रुप आणि सकारात्मक भावना निर्माण करणाऱ्या सौंदर्यीकरनाने नागरिकांमध्ये दीपावलीत उत्साहापूर्ण वातावरण आहे.