मोफत चरणसेवेची ३८ वर्षे अविरत धडपड कोटमगावच्या यात्रेत व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांनी सुरु केलेली अनोखी परंपरा

मोफत चरणसेवेची ३८ वर्षे अविरत धडपड
कोटमगावच्या यात्रेत व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांनी सुरु केलेली अनोखी परंपरा

येवला : पुढारी वृत्तसेवा

कोटमगाव येथे नवरात्रोत्सव निमित्त जगदंबा मातेच्या दर्शनास येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी भाविकांचे पादत्राणे मोफत सांभाळण्याचे काम येवल्यातील धडपड मंच या सामाजिक संस्थेतर्फे गेल्या ३८ वर्षांपासून अव्याहतपणे सुरु आहे. 

नवरात्र उत्सवाचे दरम्यान कोटमगाव येथे गेल्यावर मंदिराचे जवळच सुंदर असा 'मोफत चरण सेवा' या नावाचा स्टॉल लावलेला आपणास दिसेल.  तेथे सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर झळके व त्यांचे सहकारी कार्यकर्ते हसतमुखाने भाविकांची पादत्राणे आपल्या हाती घेऊन ती योग्य नंबरवर ठेवून त्या नंबरचे टोकण आपणांस देतील व दर्शन घेवुन आल्यानंतर आपण ते टोकण दाखविल्यानंतर त्या नंबरवरची आपलीच पादत्राणे आपणांस दिली जातात.  अशा प्रकारे संपूर्ण नवरात्रात म्हणजे दहा दिवस रोज सकाळी १० वाजेपासुन ते रात्री १० वाजेपर्यंत ही सेवा अखंडपणे चालु आहे. विशेष म्हणजे ही संपुर्ण सेवा विनामुल्य आहे. 

हा अनोखा उपक्रम सर्वांसाठीच अनुकरणीय ठरणारा असून त्यांच्या या अनमोल कार्याचा परिचय सर्वांनाच आदर्शवत ठरेल यात शंका नाही.

या कार्यात झळके यांना श्रावणराव शेलार, वैभव भांडगे, पप्पू वडे, अनिल आहेर, मयूर पारवे, दत्ता कोटमे, गोपाळ गुरगुडे, वरद लचके, मुकेश लचके आदी सहकार्य करीत असतात.  शिवाय शहरातील सॉमिलवाले पटेल कुटुंबीय रविवारचा संपूर्ण एक दिवस सेवा घेतात तर काही तरुण उत्स्फूर्तपणे दररोज थोडा थोडा वेळ आपले योगदान देत असतात.

.................................................
चरणसेवा हिच ईश्वरसेवा मानून आम्ही हे कार्य करीत आहोत. सेवा म्हटली म्हणजे त्यात उच्च-निचपणा नसतो. आम्ही करीत असलेले हे पादत्राणे सांभाळण्याचे काम हलके किंवा कमीपणाचे असे आम्ही मुळीच मानीत नाही. भाविक त्यांची सेवा करण्याची आम्हास संधी देतात यातच आम्हाला फार मोठे आत्मिक समाधान व आनंद मिळतो.

...... प्रभाकर झळके, प्रसिद्ध व्यंगचित्रकार
थोडे नवीन जरा जुने