निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर विविध पथकांची बैठक संपन्न
येवला : पुढारी वृत्तसेवा
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर 119 येवला विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब गाढवे यांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार आबा महाजन यांचा उपस्थित तहसील कार्यालय येवला येथील सभागृहात आचारसंहिता पथक,निवडणूक खर्च,सनियंत्रण व लेखांकन पथक,भरारी पथक,स्थिर सर्वेक्षण पथक, व्हिडिओ सर्वेक्षण पथक, व्हिडिओ पाहणी पथक या महत्त्वाच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण व पूर्वतयारी बाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रशिक्षणामध्ये सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ११९, येवला विधानसभा मतदारसंघ तथा तहसीलदार यांनी उपस्थित सर्व पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना निवडणुका मुक्त व निष्पक्ष वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून भारत निवडणूक आयोग यांचे निर्देशानुसार आचारसंहिता लागू झाल्यानंतर 24 तास,48 तास 72 तास यामध्ये काय कार्यवाही करायची याबाबत मार्गदर्शन केले. आचारसंहिते विषयी पीपीटी द्वारे FST,SST, VST,VVT तसेच Accounting team यांनी काय कार्यवाही करायची याबाबत मार्गदर्शन करून कायदे व कलम याविषयी मार्गदर्शन केले.
त्याचप्रमाणे कोणत्या ठिकाणी स्थिर पथक असणार आहे याबाबत माहिती देखील उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात आले.
उमेदवारांचा निवडणूक खर्च याबाबत स्वतंत्र पथक नेमण्यात आलेले आहे त्यांना देखील उमेदवाराने केलेला खर्च व शासनाने निर्धारित केलेले दर यावरून खर्चाचे मूल्यमापन करणे बाबत सूचना दिल्या.
वरील प्रमाणे प्रशिक्षणामध्ये सर्व पथकांना सखोल मार्गदर्शन करून त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.
सदर बैठकीसाठी निवडणूक नायब तहसीलदार नितीन बाहीकर, निरंजना पराते, येवला ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक,येवला शहर सहायक पोलीस उपनिरीक्षक उमेश बोरसे,निवडणूक शाखेतील सुनील महाजन,निवृत्ती नागरे,रवींद्र शेळके आदींसह सर्व पथकांचे प्रमुख व सदस्य उपस्थित होते.