येवल्यातील विस्थापित गाळे धारकांना न्याय देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेणार
आमदार दराडेच्या पुढाकाराने व्यापाऱ्यांसोबत आयोजित बैठकीत खा. श्रीकांत शिंदेचे आश्वासन
येवला : पुढारी वृत्तसेवा
येथील व्यापारी संकुल पडल्याने विस्थापित झालेल्या व्यापाऱ्यांची समस्या गंभीर आहे.नव्याने झालेल्या व्यापारी संकुलात त्यांना प्राधान्य मिळावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बैठक घेऊन येथील विस्थापित गाळेधारकांना न्याय मिळवून देऊ असे आश्वासन खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिले.
नुकतीच येथे आमदार दराडे यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी हे आश्वासन दिले.यावेळी आमदार किशोर दराडे, माजी नगराध्यक्ष बंडू क्षिरसागर,नगरसेवक प्रमोद सस्कर,मर्चंट बँकेचे संचालक नितीन काबरा,शिवसेनेचे शहर प्रमुख अतुल घटे, तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके,अमोल सोनवणे, डॉ.सुधीर जाधव आदी उपस्थित होते.
ऐन बाजारपेठेत व्यापारी संकुल राजकीय साठमारीत जमीनदोस्त झाल्याने सर्वजण उघड्यावर आले आहे.मागील १७-१८ वर्षात त्यांना न्याय मिळाला नसल्याने यात लक्ष घालून त्यांचे पुनर्वसन करत न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आमदार दराडे यांनी केली.
२००७ मध्ये व्यापारी संकुल पाडल्याने १०६ जण विस्थापित झाले आहे.त्यामुळे नव्याने उभारलेल्या व्यापारी संकुलात विशेष बाब म्हणून आम्हांला गाळे देण्यात यावे अशी मागणी नितीन काबरा,प्रमोद सस्कर,श्याम झोन्ड,गणेश कासार,श्याम दोडे,सुरेश सावंत, बळीराम शिंदे,निलेश माळवे,विपुल पटेल, संजय सोनवणे,विशाल भावसार आदींनी केली.
त्यावेळी गाळे तर गेलेच पण पालिकेने आमच्यावर गुन्हे दाखल केले असून ते मागे घ्यावे,स्व.विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री असताना लातूरमध्ये विस्थापितांना प्राधान्याने गाळे दिल्याचेही व्यापाऱ्यांनी सांगितले. यासंदर्भात अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेऊन न्याय देण्याचा प्रयत्न करू.काही गोष्टींसाठी कायदेतज्ञाचा सल्ला घेऊन निर्णय घेऊ असे शिंदे यांनी सांगितले.
"विस्थापितांना न्याय मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून खा.श्रीकांत शिंदे यांनी सर्व परिस्थिती समजून घेतली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून न्याय मिळावा यासाठी लवकरच मुंबईत बैठक घेऊ. व्यापाऱ्यांच्या आयुष्याचा प्रश्न असल्याने पुनर्वसनासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत राहू."
- किशोर दराडे, आमदार
फोटो
फोटो
येवला : विस्थापित गाळेधारकाशी बोलताना खा.श्रीकांत शिंदे.समवेत आमदार किशोर दराडे व पदाधिकारी.