550 वर शाळांना आंधळे परिवाराकडूनचक्रधर स्वामींच्या प्रतिमा भेट
आजपासून शासकीय,निमशास्त्रीय कार्यालये, शाळात होणार जयंती साजरी
येवला : पुढारी वृत्तसेवा
महानुभाव पंथाचे संस्थापक,थोर समाजसुधार आणि तत्त्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांची जयंती (ता.५)शासकीय व निम शासकीय कार्यालयात साजरी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.या पार्श्वभूमीवर पाचोरे बु. येथील स्व. सीताराम आंधळे परिवाराकडून येवला-लासलगाव परिसरात 550 वर शाळांना आज भगवान श्री चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमांचे वाटप करण्यात आले.
महानुभाव धर्मीयांच्या श्रद्धेनुसार त्यांना ईश्वरांच्या पंचावतारांपैकी पाचवा अवतार मानले जाते.लीळाचरित्र या मराठीतील पहिल्या चरित्रग्रंथाचे ते नायक म्हणून इतिहासात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. वैदिक परंपरेला नाकारून सर्वांना मोक्षाचा समान अधिकार देणारे चक्रधर स्वामी हे महाराष्ट्रातील पहिले ज्ञात समाज सुधारक होत.सर्वज्ञ चक्रधर स्वामींचे जीव उद्धारक विचार तत्त्वज्ञान मानवतावादी शिकवण सर्व जीव जातीच्या कल्याणासाठी स्वामींचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ५ सप्टेंबरला सर्वज्ञ चक्रधर स्वामी अवतार दिन अर्थात जयंती शाळा, महाविद्यालये,शासकीय निमशासकीय कार्यालय आदी ठिकाणी साजरी करावी अशी मागणी महानुभाव परिषद व उपदेशी नामधारक मंडळीच्या वतीने करण्यात येत होती.
जिल्ह्यातही महानुभाव संप्रदायाचे मोठे साधक असून महंत चिरडेबाबा,महंत सुकेनकरबाबा, महंत विद्वानबाबा,कवीश्वर कुलाचार्य कारंजेकरबाबा आदींनी ही मागणी सातत्याने लावून धरली होती.त्यामुळे मंत्री छगन भुजबळ,माजी आमदार बाळासाहेब सानप,आमदार नरेंद्र दराडे,आमदार किशोर दराडे,दिनकर पाटील,प्रकाश ननावरे, स्व.सिताराम आंधळे आदींनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.अखेर या मागणीला यश आले असून शासनाने परिपत्रक निर्गमित करत आज (ता.५) सर्वत्र जयंती साजरी करण्याच्या सूचना केल्या आहेत.जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी देखील स्वतंत्रपणे पत्र निर्गमित करून शाळांना जयंती कार्यक्रम घेण्याच्या सूचना केल्या आहेत त्यापार्श्वभूमीवर धर्मरत्न स्व.सिताराम आंधळे यांच्या परिवाराकडून तानाजी आंधळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी येवला लासलगाव परिसरातील 550 वर शाळांना आकर्षक व सुंदर अशा प्रतिमांचे वाटप केले आहे.समाज हितासाठी स्वामींनी केलेला उपदेश आणि ज्ञान प्रेरणादायी आहे.ते तळागाळापर्यंत पोचविण्यासाठी शासनाचा निर्णय कौतुकास्पद असल्याचे सांगत तालुक्यातील शाळांनी आनंद हार्डवेअर या ठिकाणाहून प्रतिमा घेऊन जाव्यात असे आवाहन तानाजी आंधळे,ज्ञानेश्वर आंधळे यांनी केले आहे.
फोटो
येवला : विविध शाळांच्या प्रतिनिधींना चक्रधर स्वामींची प्रतिमा भेट देताना तानाजी आंधळे व इतर.