नगर मनमाड महामार्गावर आंबेवाडी शिवारात हुंडाई कारचा विचित्र अपघात 2 ठार तर 1 जखमी
येवला : पुढारी वृत्तसेवा
शुक्रवारी पहाटे नगर मनमाड महामार्गावर आंबेवाडी शिवारात हुंडाई कारचा विचित्र अपघात झाला. मित्राला मनमाड रेल्वे स्थानक येथे सोडवण्यासाठी जात असताना आंबेवाडी शिवारात हुंडाई कारला पाठीमागून अज्ञात वाहनाने धडक दिल्याने कार रस्त्याच्या तीस ते चाळीस फूट बाजूला हवेत उडून फेकल्या गेली. त्यामुळे कारचा चक्का चुर झाला असून या अपघातात पाठीमागे बसलेले दोघेजण जागीच ठार झाले आहे व चालक गंभीर जखमी झाला .
आकाश रमेश पवार, निलेश दगु शेवाळे दोघे राहणार सावरगाव तालुका येवला असे ठार झालेल्या व्यक्तींची नाव असून शुभम गंगाधर पानमळे असे जखमी चालकाचे नाव आहे हा देखील सावरगाव येथील राहणार आहे .
कारचा एवढा चक्काचुर झाला होता की दोन्ही मृतदेह पत्रा कापून बाहेर काढावे लागले
घटनेची माहिती समजताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले . खाजगी रुग्णवाहिके द्वारे दोन्ही मृतदेह उपजिल्हा रुग्णाला येवला येथे आणण्यात आले असून जखमी चालकावर उपजिल्हा रुग्णालय येवला येथेच उपचार सुरू आहे .
या अपघाताचा तपास पोलीस करत आहे.
सदर अपघात झाल्यानंतर चालक हा पायी चालत शिवसेना नेते संभाजी पवार यांच्या बंगल्यावर आला, पहाटेच्या सुमारास संभाजी पवार यांना उठवत
पोलिसांना व रुग्णवाहिकेला फोन करण्यास सांगितले. अपघात करताना मदत करण्यासाठी तत्पर असलेल्या संभाजी पवार यांनी तात्काळ आपले दोन-चार कार्यकर्ते घेऊन घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले.