दरसवाडी धरणातून येवल्यासाठी दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालव्यास पाणी सोडले



दरसवाडी धरणातून येवल्यासाठी दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालव्यास पाणी सोडले


येवल्यातील उत्तर पूर्व दुष्काळी भागाला मिळणार दिलासा...


 अंबादास बनकर यांच्या हस्ते जलपूजन दरसवाडी कालव्याचे गेट उघडले

येवला : पुढारी वृत्तसेवा

 येवला तालुक्यातील उत्तरे पूर्व भागातील जनतेसाठी जीवन मरणाचा प्रश्न असलेल्या मांजरपाडा प्रकल्पातून दरसवाडी धरण ओव्हर फ्लो झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते अंबादास बनकर यांच्या हस्ते जलपूजन करण्यात येऊन दरसवाडी कालव्याचे गेट उघडण्यात आले असून दरसवाडी डोंगरगाव कालव्यातून येवल्याच्या दिशेने पाणी प्रवाहित झाले आहे. त्यामुळे येवल्यातील उत्तर पूर्व दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळणार आहे.

या प्रसंगी माजी पंचायत समितीचे  सदस्य    मोहन शेलार, मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयाचे प्रमुख स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, येवला बाजार समितीचे माजी सभापती किसनकाका धनगे, संतोष खैरनार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.


राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मांजरपाडा प्रकल्पाच्या पाण्याने पुणेगाव व दरसवाडी तलाव ओव्हरफ्लो झाले असून दरसवाडी धरणातून पाणी जलपूजन करून येवला तालुक्यासाठी सोडण्यात आले आहे. दरसवाडी ते डोंगरगाव या दरम्यान काँक्रीटीकरण अधिक झाले असल्याने पाणी कमीतकमी वेळेत डोंगरगाव येथे पोहचले असा विश्वास पाणी आंदोलक मोहन शेलार यांनी यावेळी व्यक्त केला आहे.


पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याचे काम सन १९७२ ला सुरू झाले. सन  २००४ साली मंत्री छगन भुजबळ हे येवला विधानसभा मतदारसंघातुन निवडून आल्यानंतर या कालव्याचे नूतनीकरण करण्यास चालना दिली. मात्र दरसवाडी धरणातून येवला तालुक्यासाठी फक्त ओव्हरफ्लोचे पाणी मिळणार होते. हे पाणी पुरेसे नसल्याने मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून मांजरपाडा प्रकल्पाची निर्मिती करून गुजरातला जाणारे पाणी अडवण्यात येऊन बोगद्याद्वारे पुणेगाव धरणात आणण्यात येऊन तेथून दरसवाडी धरणात टाकण्यात येत आहे. त्यातून हे पाणी दरसवाडी डोंगरगाव कालव्याच्या माध्यमातून येवला व चांदवड बंधारे भरण्यात येत आहे. 


अनेक अडचणींना तोंड देत हा प्रकल्प पूर्ण झाला असून दरसवाडी ते डोंगरगाव कालव्याचेही काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. सुमारे  ४० ते ४५ वर्षांनंतर मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून हे शक्य झाले आहे. त्यामुळे येवला व चांदवड तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरयांना सुगीचे दिवस येणार आहे.  


आज दरसवाडी डोंगरगाव कालव्यातून हे पाणी येवल्याच्या दिशेचे प्रवाहित झाले असून लवकरच हे पाणी डोंगरगाव ला पोहोचणार आहे. या पाण्यामुळे चांदवड व येवला तालुक्यातील दुष्काळी भागाचा सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे उत्सवाचे वातावरण आहे.
थोडे नवीन जरा जुने