मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून आयोजित रोजगार मेळाव्यास युवकांचा मोठा प्रतिसाद

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून आयोजित रोजगार मेळाव्यास युवकांचा मोठा प्रतिसाद


येवल्यात आयोजित पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात ३४३८ उमेदवारांची नोंदणी

येवला : पुढारी वृत्तसेवा

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकारातून येवला-लासलगाव परिसरातील तरुणांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक यांच्या वतीने येवल्यात माऊली लॉन्स येथे पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या रोजगार मेळाव्यास युवकांचा मोठा प्रतिसाद लाभला. या मेळाव्यात एकूण ३४३८ उमेदवारांनी नोंदणी केली. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रातिनिधी स्वरूपात  नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आले.


 या मेळाव्यात सहभागी झालेल्या एकूण ३४३८ उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखत दिली. त्यापैकी २३१७ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. तसेच ११२१ उमेदवारांची अंतिम निवड करून त्यापैकी २५१ उमेदवारांना मेळाव्याच्या ठिकाणीच नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.


या मेळाव्यात नाशिकमधील महिंद्रा, बॉश, डाटा मॅट्रिक्स, युवाशक्ती फाऊंडेशन, रिंगप्लस ॲक्वा, एम.डी. ऑटो इंडस्ट्रीज, बजाज सन्स, सॅमसोनाईट, मदरसन ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी अँन्ड इंजिनिअरिंग, ऑटोमेक, मोसदोरफर इंडिया, डिस्टील एज्युकेशन अँन्ड टेक्नॉलॉजी, रामवी मॅनेजमेंट सर्व्हिसेस, यशस्वी अ‍ॅकॅडमी फॉर स्किल्स, बिव्हीजी इंडीया, मिराक्वई व्हेन्च्युअर्स, गोविंदा एचआर सर्व्हिसेस, सक्सेस जॉब प्लेसमेंट, हिताची अस्टीमो ब्रेक सिस्टीम्स (जळगाव) अशा २४ नामांकित कंपन्या व नियोक्ते सहभागी झाले होते. या माध्यमातून इयत्ता १० वी ते पदवीधर, आयटीआय, डिप्लोमा / डिग्री इंजिनिअर, फार्मसी अशा विविध शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांना  रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या.

मेळाव्यात मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षणासाठी एकूण २११७ उमेदवारांनी अर्ज केले. त्यातील १५ युवकांना प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तीपत्र देण्यात आले.


तसेच संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, महात्मा फुले विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्याक विकास महामंडळ यांचे देखील स्टॉल्स लावण्यात आले होते. या विविध महामंडळाच्या माध्यमातून युवकांसाठीच्या योजना, व्यवसाय उभारणीसाठी मार्गदर्शन व अर्थसहाय्य याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
थोडे नवीन जरा जुने