दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालव्याचे पाणी येवला मनमाड रस्ता क्रॉसिंगमधून नगरसुल डोंगरगावच्या दिशेने प्रवाहीत
येवला : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील उत्तर पूर्व भागातील जनतेसाठी लाभदायक असलेला गेल्या कित्येक वर्षाची आस लागून असलेल्या पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालव्याचे पाणी येवला मनमाड रस्ता क्रॉसिंग मधून नगरसुल डोंगरगावच्या दिशेने प्रवाहीत झाले आहे.
छगन भुजबळांच्या अथक भगीरथ प्रयत्नांमुळे या कालव्याची स्वप्नपूर्ती पूर्ण होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्या हस्ते गावकऱ्यांच्या उपस्थितीत मनमाड हायवे नजीक क्रॉसिंगवर जलपूजन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत कालव्यात उतरून आनंद उत्सव साजरा केला.
येवल्याला जलसंजीवनी देण्याच्या दृष्टीने राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून मांजरपाडा देवसाने हा अतिशय महत्वपूर्ण प्रकल्प साकारण्यात आला आहे. या प्रकल्पातून येणारे पाणी येवल्याला पोहोचविण्यासाठी संपूर्ण कालव्याचे अस्तरीकरण करण्यात येत आहे. काल दरसवाडी धरणातून ओव्हर फ्लोचे पाणी सोडल्यानंतर केवळ १५ तासात आज हे पाणी येवला तालुक्यातील कातरणी शिवारात पोहोचले. पाणी कातरणी शिवारात पोहोचताच तीन पिढ्यांची स्वप्न पूर्ती होत असल्याने शेतकऱ्यांनी गुलालाची उधळण करून फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला.
यावेळी विधानसभा अध्यक्ष वसंतराव पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, पाणी आंदोलक मोहन शेलार, गणपत कांदळकर मकरंद सोनवणे, अल्केश कासलीवाल, संतोष खैरनार, विजय जेजुरकर, अनिल दारुंटे, संजय पवार, दीपक गायकवाड, प्रीतम शहारे यांच्यासह ग्रामस्थ व पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.