येवल्यात महंत रामगिरी यांच्यावर गुन्हा दाखल
येवला : पुढारी वृत्तसेवा
सरला बेटाचे महंत मठाधिपती रामगिरी महाराज यांनी सिन्नरच्या पंचाळे गावामध्ये प्रवचनाच्या दरम्यान मुस्लिम धर्माविषयी वक्तव्य केले होते. या वक्तव्याचे व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर चांगलेच व्हायरल होत आहेत. या केलेल्या वक्तव्यातून धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. या वक्तव्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यामुळे येवला शहरात गुरुवारी रात्री मुस्लिम समाजाने ठिया देत रामगिरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या प्रकरणी काजी सलीमउद्दीन जलालुद्दीन यांचे फिर्यादीवरून बी एन एस एस संहितेच्या कलम २९९ अन्वये रामगिरीजी महाराज यांचे विरोधात येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित महंतांचे ठिकाण श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येत असल्याने सदरचा गुन्हा श्रीरामपूर पोलीस ठाणे येथे वर्ग करण्यात आला आहे.
दरम्यान शहरातील परिस्थिती नियंत्रणात असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
फोटो : येवला शहर पोलीस स्टेशनला ठिय्या देऊन बसलेले मुस्लिम समुदाय