मलेरिया,डेंगूसह साथरोगांच्या नियंत्रणासाठी उपाययोजना राबवा येवल्यात गटविकास अधिकारी पाटेकर यांच्या पाणी गुणवत्ता सभेत यंत्रनेला सूचना

मलेरिया,डेंगूसह साथरोगांच्या नियंत्रणासाठी उपाययोजना राबवा
येवल्यात गटविकास अधिकारी पाटेकर यांच्या पाणी गुणवत्ता सभेत यंत्रनेला सूचना  

येवला : पुढारी वृत्तसेवा

सततच्या पावसामुळे तालुक्यात ठिकठिकाणी पाणी साचून साथीचे आजार निर्माण होण्याची भीती आहे.त्यामुळे मलेरिया,डेंगू,चिकनगुनियासह साथरोगाच्या नियंत्रणासाठी ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने सतर्क रहावे अशा सूचना गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर यांनी दिल्या. हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यावर प्रशासकीय कारवाइचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
येथील पंचायत समितीत ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या पाणी गुणवत्ता सभेत विस्तार अधिकाऱ्यांसह आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी दक्षता घेण्यासाठी सक्त सूचना दिल्या.यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नवलसिंग चव्हाण,डॉ.कातकडे व विस्तार अधिकारी उपस्थित होते.पावसाचे पाणी साठ्ण्याजोगे मोठे खड्डे,व्हाल्व व नळ गळती,कचऱ्याचे ढिग,पाण्याचे डबके,घरातील हौद,बॅरल,फुलदाण्या, टाक्या,निरुपयोगी टायर कुलर मधील पाणी वापरात नसलेली विहीर आदी कारणांमुळे डासांचा प्रादुर्भाव होऊन डेंगू मलेरिया चिकुनगुनिया यासारखे किटकजन्य आजारांच्या साथी होण्याची शक्यता आहे.त्यामुळे आरोग्य सहाय्यक व आरोग्य कर्मचारी यांनी पाणीपुरवठा योजनेस भेट देऊन नियमित ओ.टी. परीक्षण करावे,जलसुरक्षा शुद्धीकरणाचे प्रशिक्षण देण्यात यावे. पाणी नमुने टी.सी. एल. नमुने व तापाच्या रुग्णाचे रक्तनमुने तात्काळ तपासणीसाठी पाठवावे, टीसीएल साठ्याची पडताळणी करावी, नळ गळती, व्हाल्व गळती व पाणीपुरवठा योजनेतल्या त्रुटी ग्रामपंचायतणे दुरुस्त करून घ्याव्यात तसेच आरोग्य कर्मचारी यांनी पूर्णवळ मुख्यलयास थांबावे,नियमित साथरोग सर्व्हेक्षण करून साथ उद्रेक परिस्थिती जाणवल्‌यास तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना ग्रामपंचायतीने नियोजित करावे.साथरोग नियंत्रणासाठी आवश्यक सर्व प्रकारची औषधे व साधन सामुग्री उपलब्ध ठेवावी अशा सूचना यावेळी पाटेकर यांनी दिल्या.
पाणी साचेल असे निकामी टायर,फुटक्या बादल्या,फुटके प्लाष्टीकची विल्हेवाट लाऊन परिसर स्वच्छ ठेवावा.टायर्सचे पंक्चर दुकानातील टायर्समधील पाणी छिद्रे पाडून काढून टाकावे,डासांचा प्रतिबंध करावा,नळाभोवतीचे खड्डे बुजवट नळांना तोट्या बसविण्यात याव्यात,साठलेल्या पाणी साठ्यात गप्पी मासे सोडा,प्रत्येक गावात गप्पी मासे पैदास केंद्र सुरु करा तसेच गावातील सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यात यावी,गटारी तुंबणार नाही तसेच गटारे वेळोवेळी स्वच्छ राहतील असे नियोजन करणेत यावे,गावात जंतुनाशके व कीटक नाशकांची आवश्यकतेनुसार फवारणी व धूरफवारणी करण्यात यावी,पाण्याच्या टावया नियमितपणे स्वच्छ कराव्यात व त्यावर स्वच्छ केल्याची दिनांक लिहावी आदी सूचना यावेळी पाटेकर यांनी केल्या.तसे पत्रही ग्रामपंचायत व आरोग्य विभागाला देण्यात आले आहे.
 
थोडे नवीन जरा जुने