पाच हजार महिलांना मोफत व्यावसायिक प्रशिक्षण देऊन एड. लासुरे यांनी सावित्रीबाईचा वारसा जपला - लोंढे
येवला : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील ग्रामीण गरजू महिलांना चूल - आणि मुल या पलीकडे विचार करायला भाग पाडून तब्बल पाच हजार महिलांना मोफत व्यावसायिक प्रशिक्षण देऊन तेज तारा फाउंडेशनच्या अध्यक्षा एड. तेजश्री लासुरे यांनी सावित्रीबाईचा वारसा पुढे चालवला असून एवढ्यावरच न थांबता त्यांनी काही गरजू महिलांना लासलगावच्या जयदत्त होळकर यांच्या कडून मोफत शिलाई मशीन व इतर साहित्य उपलब्ध करून दिले आहे. हे कार्य उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन निवृत्त प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश विनायकराव लोंढे यांनी केले.
तेज तारा फाउंडेशनच्या वतीने मार्च महिन्यामध्ये फॅशन, डिझाईन व ब्युटी पार्लर तसेच केक बनवण्याचे मोफत प्रशिक्षण देण्यात आले होते. त्या प्रशिक्षित महिलांना प्रमाणपत्र वाटप व मार्गदर्शन मेळावा शहरातील महात्मा फुले नाट्य गृहात संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त न्यायाधीश लोंढे, १९७१ च्या भारत - पाकिस्तान युद्धातील वीर चक्र पुरस्काराने सन्मानित सैनिक कचरू साळवे, वेदिका जयदत्त होळकर, श्रीकृष्ण एंझोटेक कंपनीच्या सीईओ मीनल वर्मा, महिला व बाल प्रकल्प अधिकारी वंदना शिंपी, किशोर सोनवणे, अर्चना शिंदे, उपस्थित होते.
यावेळी तालुक्यातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्तुत्ववान संगीत नन्दनवार, अंजली एलमामे, ज्ञानेश्वर वाघ, बाळासाहेब वाबळे कलीम पठाण, या पाच जणांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. फुले नाट्यगृह खचाखच भरून बाहेर ही हजारो महिलांची गर्दी होती. यावेळी विर चक्र पुरस्कार प्राप्त निवृत्त सैनिक कचरू साळवे, लासलगाव येथील फरीदा काझी, कलीम पठाण, वाबळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्तविक तेजश्री लासुरे यांनी, सूत्रसंचालन राजश्री पिंगळे यांनी, तर बिपिन लासुरे, स्मार्ट इंडिया आयटी ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी, यांनी व्यवस्थापन केले. आभार प्रदर्शन चंद्रशेखर कदम यांनी केले.
फोटो : -
तेज तारा फाउंडेशनच्या वतीने पाच हजार महिलांना मोफत व्यावसायिक प्रशिक्षण देऊन, वेदिका होळकर व प्रसिद्ध उद्योजिका मीनल वर्मा यांच्या सहकार्याने गरजू प्रशिक्षणार्थींना मोफत शिलाई मशीन वाटप करताना फाउंडेशनच्या अध्यक्षा एड तेजश्री लासुरे, निवृत्त न्यायाधीश विनायकराव लोंढे, वीर चक्रने सन्मानित कचरू साळवे आदी.