आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाचे कोटमगाव विठ्ठल मंदिरात विठ्ठल भक्तांची गर्दी
येवला : पुढारी वृत्तसेवा
आषाढी एकादशीच्या निमित्ताने येवला तालुक्यातील प्रति पंढरपूर समजले जाणारे विठ्ठलाचे कोटमगाव येथील श्री विठ्ठल मंदिरात आज तालुक्यासह विविध ठिकाणच्या वारकऱ्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. या ठिकाणी सकाळपासून विविध भागातील दिंडी द्वारे वारकऱ्यांनी आपली सेवा रुजू केली. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी भगवान श्री विठ्ठल रुक्मिणीची पूजा करत मनोभावे दर्शन घेतले. तसेच चांगला पाऊस पडू दे, दुष्काळाचं सावट दूर होऊ दे अशी प्रार्थना विठ्ठलाच्या चरणी केली. यावेळी उपस्थित भाविकांना मंत्री छगन भुजबळ यांनी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.
इथे येणाऱ्या दिंडीं मधील विठ्ठल भक्त वारकरी यांना येवला व्यापारी महासंघाकडून खिचडीच्या महाप्रसादाचे पाणी पाऊच वाटप करण्यात आले. गेल्या दोन-तीन वर्षापासून व्यापारी महासंघाचे संस्थापक योगेश सोनवणे व सहकारी यांच्याकडून या ठिकाणी येणाऱ्या हजारो भाविकांना खिचडी महाप्रसाद पुरवला जात आहे.