युवकांना तंत्रज्ञान,गरजुंना अनुदान,शेतकऱ्यांचा सन्मान! हितेंद्र पगार : पिंपळगाव जलाल येथे कृषि मेळाव्यात

युवकांना तंत्रज्ञान,गरजुंना अनुदान,शेतकऱ्यांचा सन्मान!
हितेंद्र पगार : पिंपळगाव जलाल येथे कृषि मेळाव्यात मार्गदर्शन


येवला : पुढारी वृत्तसेवा
शेतीतील प्रगतीसाठी युवकांना तंत्रज्ञानाची दिशा दाखविणे,गरजू शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ देणे अन शेतीत प्रगती साधणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करणे हेच कृषि विभागाचे सूत्र आहे असे प्रतिपादन मंडळ कृषी अधिकारी हितेंद्र पगार यांनी केले.
कृषी विभागामार्फत साजरा होत असलेल्या कृषि संजीवनी पंधरवाडा कार्यक्रमात पिंपळगाव जलाल येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
या शेतकरी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रवीण देशमुख होते तर सायकलिस्ट असोसिएशनचे विजय भोरकडे,सामाजिक कार्यकर्ते रंगनाथ भोरकडे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
खरीप हंगामाच्या प्रारंभी शेतकऱ्यांकडून सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब प्रभावीपणे व्हावा यासाठी कृषी संजीवनी पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहेत.कृषि विभाग राबवत असलेल्या बिजप्रकीया मोहीम,जमिन सुपिकता, गुणवत्तापूर्ण निविष्ठांची ओळख या बाबत जनजागृती करण्यात येऊन विविध पिकांची लागवड पद्धती,महिला व प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान,मग्रारोहयो,पिक विमा व अपघात विमा या योजनांची माहिती या माध्यमातून देण्यात आली.शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि शेतीतील विकासासाठी कृषी विभाग सदैव तत्पर आहे, यासाठी विविध योजना आहेत परंतु मार्गदर्शन करण्यासाठी देखील गावोगावी कृषी विभागाचे अधिकारी- कर्मचारी तत्पर असतात.त्याचा देखील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी पगार यांनी केले.
यावेळी कृषी विभागाचे विठ्ठल सोनवणे,संतोष गोसावी,चंद्रकांत जाधव यांनी शेतकऱ्यांसाठी विविध लाभाच्या फायदाच्या योजनांची माहिती देऊन त्या योजनांचा लाभ घेण्याची कार्यपद्धती शेतकऱ्यांना सांगितली.कृषी संजीवनी पंधरवाड्याचे औचित्य साधून येथील राम मंदिर परिसरात विविध वटवृक्षांचे रोपण करण्यात आले तसेच पिंपळगाव जलाल येथील गुणवंत विद्यार्थ्यांना वृक्ष रोपणासाठी रोपांचे वितरण करून सन्मानित करण्यात आले.सूत्रसंचालन व संयोजन नरेंद्र आघाव यांनी केले.मिलिंद धिवर,एन.व्ही.साखरे, संजय मोरे आदींनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.
फोटो
पिंपळगाव लेप : शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना मंडळ कृषी अधिकारी हितेंद्र पगार
थोडे नवीन जरा जुने