अंजनाबाई शहादू वाघ यांना अभिनव खान्देश, धुळे यांचा राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार जाहीर
येवला : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानच्या मार्गदर्शक अंजनाबाई शहादू वाघ यांना कै. सौ. नलिनी प्रभाकर सूर्यवंशी, उपसंपादिका, साप्ताहिक अभिनव खान्देश. धुळे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा अभिनव खान्देश राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
अभिनव खान्देशकडून राज्यभरातील नऊ कर्तृत्ववान महिलांना दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे हे चौथे वर्ष असल्याचे संपादक प्रभाकर सूर्यवंशी यांनी कळविले आहे.
अंजनाबाई वाघ स्वतः अशिक्षित असून त्यांनी मुलांना शिक्षणाचे महत्व समजून सांगून चांगला नागरिक होण्याचे संस्काराचे बाळकडू पाजले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुलांना शिक्षण देवून मुले मोठ्या पदावर काम करीत आहेत. मोठा मुलगा प्रशांत वाघ हे मराठी साहित्याचे प्रसिद्ध कवी, लेखक, व मुखपृष्ठ परीक्षक असून सोलापूर येथील मोठ्या कंपनीत विक्री आणि विपणन विभागात व्यवस्थापक म्हणून काम पहातात, दुसरा मुलगा संजय वाघ हे कोपरगाव येथील साखर कामगारांच्या पतसंस्थेत कार्यरत आहेत तर सर्वात लहान मुलगा राजेश वाघ हे देशसेवेत जे सी ओ (JCO) पदावर कार्यरत आहेत. मुलगी तिच्या सासरी गृहिणी आहे.
अंजनाबाई वाघ यांनी मुले लहान असतांना त्याकाळात गवताचे ओझे सात किलोमीटर दूरवर डोक्यावर घेऊन विकायला नेले, दुष्काळात नालाबर्डिंग, मोलमजुरी करून, धुणीभांडी, गोधडी शिवणे अशी उदरनिर्वाहासाठी पतीला मदत म्हणून कामे केली. शेती मशागतीतही त्यांनी जिकरीने काम करून चिकाटीने संसार केला. कुणाच्या दारात मुलांना जाऊ दिले नाही. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत संसार करून आज मुलांना चांगले संस्कारित केले आहे. कोरोनात पती शहादू वाघ यांचे निधन झाले, त्यांनतर परिवाराला आधार देवून पतीच्या स्मृतीदिनानिमित्त गेल्या तीन वर्षापासून शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानच्या माध्यमातून राज्यस्तरीय साहित्य संमेलन भरवून राज्यभरातील साहित्यिकांना पुरस्कार देत आहेत यासाठी मार्गदर्शक म्हणून मोलाची भूमिका त्यांनी बजावली आहे.
अभिनव खान्देशचे संपादक प्रभाकर सूर्यवंशी यांनी अभिनव खान्देशकडून राज्यभरातील मा. वर्षा सुरासे- पुणे, मा मोनिका शिंपी – धुळे, मा मनिषा गायकवाड- राहुरी, डॉ. पल्लवी परुळेकर बनसोडे-मुंबई, मा कांचन प्रकाश संगीत- मुंबई, मा मृणाल गीते- नाशिक, मा. जया नेरे- नवापूर, प्रा. राजश्री चव्हाण- धुळे अशा एकूण नऊ कर्तृत्ववान महिलांना दिल्या जाणाऱ्या पुरस्कारात अंजनाबाई शहादू वाघ यांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार जाहीर केला आहे.