जळगाव नेऊरच्या चार पिढ्यांना तृप्त छाया देणारे वडाचे झाड विसावले.
ग्रामस्थांकडून वटवृक्षाला श्रद्धांजली देत अभिवादन
येवला : पुढारी वृत्तसेवा
संत तुकाराम महाराजांनी वृक्षांचे मानवाशी असलेले नाते व वृक्षाचे महत्त्व सांगताना अतिशय सुंदर असा अभंग सांगितला आहे तो म्हणजे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षीही सुस्वरे!आळविती!!या अभंगाचा प्रत्यय जळगाव नेऊर ता.येवला येथील ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिक चार पिढ्यांपासून प्रत्यक्ष घेत होते.येथील चार पिढ्यांना सुमारे ३०० वर्षाचे तृप्त छाया देणारे वडाचे झाड मंगळवार दि.११ रोजी उन्मळून पडले.बुधवार दि.१२ रोजी ग्रामस्थांनी श्रद्धांजली वाहून वटवृक्षास अखेरचे अभिवादन केले.असा वटवृक्ष पुन्हा होणे नाही असे नागरिक व पर्यावरण प्रेमींकडून हळहळ व्यक्त करुन बोलले जात आहे.झालेल्या घटनेत ग्रामपंचायतीचे गाळे व खाजगी गाळे यांचे नुकसान झाले.जिवितहानी झाली नाही हे विशेष.कारण शुक्रवारचा आठवडे बाजार असता तर मोठा अनर्थ झाला असता अशी चर्चा प्रत्येकाच्या मुखातून व्यक्त होत होती.यावेळी जय मल्हार भक्त परिवाराचे पदाधिकारी प्रभाकर शिंदे (पाटील बाबा) यांचे हस्ते वडाची पुजा करत भंडारा उधळून श्रीफळ अर्पण केले.ज्येष्ठ ग्रामस्थ बबन शिंदे,अण्णा शिंदे,प्रभाकर घुले,माजी सरपंच कैलास कुऱ्हाडे,प्रकाश शिंदे,श्रावण शिंदे,चिंधु वरे,बाळनाथ शिंदे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नाशिक-औरंगाबाद (सध्याचे छत्रपती संभाजीनगर) या रस्त्याचे रुंदीकरणासाठी अनेक वटवृक्षांची कत्तल करून हायवे रस्ता तयार केला.महाकाय वृक्षांची कत्तल झाल्यामुळे सदर रस्ता झाडांविना पोरका झाला होता.असंख्य वडांची झाडे यात उद्ध्वस्त झाले.जळगाव नेऊर बाजारतळात एकमेव वडाचे झाड होते.दर शुक्रवार रोजी भरणारा आठवडे बाजार वडाच्या सावलीत सामावून जायचा.वटवाघूळ,पक्ष्यांचे थवेच्या थवे वास्तव्य करायचे.त्यामुळे कायम येथे चिवचिवाट राहायचा.कधी कधी वानरांचेही वास्तव्य असायचे.नागपंचमी सणाला झोके खेळण्यासाठी रांगा लागायच्या.याच झाडावर सुर पारंब्या खेळण्यास चिमुकले तरबेज झाली होती. पुर्वी शाळेतील कवायती याचं झाडाखाली व्हायच्या.तसेच अंत्यविधी कार्यक्रमास आलेले सर्व ग्रामस्थ याच झाडाखाली बसत असत.वटपौर्णिमेला पुजा करण्यासाठी महिलांची प्रचंड गर्दी व्हायची.त्यामुळे महिलावर्गानेही हळहळ व्यक्त केली.
मंगळवार दि.११ रोजी सदर वडाचे झाड उन्मळून पडत विसावल्याने अनेक पर्यावरण प्रेमींबरोबर ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त करत बुधवार दि.१२ रोजी ग्रामस्थांनी श्रद्धांजली वाहून वटवृक्षास अखेरचा निरोप दिला मात्र कायमस्वरूपी या वडाच्या आठवणी लक्षात राहतील.
प्रतिक्रिया - पर्यावरणासाठी झाडांचे महत्त्व लक्षात घेता जळगाव नेऊर स्मार्ट ग्रामपंचायतीच्या वतीने गाय नदीच्या काठी व स्मशानभूमीच्या आसपास वडांच्या झाडांची लागवड करून संवर्धन केले जाईल. वडांच्या झाडांसमवेत इतर झाडांचीही लागवड करण्यात येईल.- रंजनाबाई शिंदे, सरपंच, स्मार्ट ग्रामपंचायत जळगाव नेऊर (येवला).
फोटो खाली- जळगाव नेऊरच्या चार पिढ्यांना तृप्त छाया देणारे वडाचे झाड मंगळवारी उन्मळून पडले.