केंद्रप्रमुख संघटनेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर दंडगव्हाळ यांची निवड
येवला : पुढारी वृत्तसेवा
अंदरसुल येथे केंद्रप्रमुख संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणीची सभा नुकतीच पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख संघटनेचे राज्य उपाध्यक्ष भाऊसाहेब निकम होते.
जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र कुशारे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. जिल्हाध्यक्ष राजेंद्र निकुंभ व सरचिटणीस सीताराम कदम यांनी केंद्रप्रमुखांच्या अडीअडचणी समजावून सांगितल्या आणि पुढील कामकाजाविषयी माहिती समजावून दिली. अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र कुशारे यांनी येवला तालुका कार्यकारिणी स्थापन करण्यासाठी
प्रस्ताव ठेवला असता, जिल्हा कोषाध्यक्ष विजय खैरनार यांनी त्या प्रस्तावाला अनुमोदन दिले. त्यानुसार एकमताने कार्यकारिणी स्थापन करण्यात आली. तालुकाध्यक्ष म्हणून चंद्रशेखर दंडगव्हाळ तर सरचिटणीसपदी अरुण खरोटे यांची निवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी रमेश उगले व कोषाध्यक्षपदी नारायण डोखे यांची निवड करण्यात आली. दरम्यान, निवड करण्यात आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सोमठानदेशचे केंद्रप्रमुख शशिकांत पानगव्हाणे जिल्हा संघटक जनार्दन देवरे यांनी अभिनंदन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पदवीधर शिक्षक दादा वाघमोडे यांनी विशेष परिश्रम घेतले.