धडपड मंच तर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तुंचे वाटप
येवला : पुढारी वृत्तसेवा
सर्वात श्रेष्ठ धन हे विचारधन होय. या धनाचे वैशिष्ट्य म्हणजे हे विद्याधन चोरीला जात नाही. त्याचे आपल्याला रक्षण करावे लागत नाही. त्यात कोणी वाटेकरी नसते. ते स्वत:हुन वाटले तर ते वाढतच जाते. असे विद्याधन आपणाला मिळते ते शिक्षणातुन आणि ते मिळविण्याची संधी जी तुम्हाला मिळाली आहे त्याचा पुरेपुर फायदा करुन घ्या असे प्रतिपादन धडपड मंचचे प्रभाकर झळके यांनी केले. प्रसंग होता येथील सेवाभावी संस्था धडपड मंच तर्फे विद्यार्थ्यांना शालेय वस्तु वाटपाचे.
येथील सेवाभावी संस्था धडपड मंच तर्फे सालाबाद प्रमाणे यंदाही बालवाडी ते १० वी पर्यंतच्या आर्थिक दृष्ट्या कमजोर असणार्या विद्यार्थ्यांना शालेय वस्तुंचे कार्यक्रमाच्या अध्यक्षा ब्रह्माकुमारी नीता दीदी यांच्या हस्ते वाटप करण्यांत आले. येवला मर्चंट बँकेच्या डॉ. हेडगेवार सभागृहात झालेल्या कार्यक्रमात १७५ विद्यार्थ्यांना वह्या, पाटी, पेन्सील, पेन, खाऊचा पुडा आदी शालेयउपयोगी वस्तुंचा लाभ मिळाला. यावेळी विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदित झालेले दिसुन आले. गेल्या २१ वर्षा पासुन हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. याप्रसंगी उपस्थित नीता दीदी, डॉ. सागर बोळे, नारायण शिंदे, प्रा. दत्तात्रय नागडेकर, किशोर सोनवणे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. उपस्थितांनी बोलतांना या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमास पालक वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार धडपड मंचचे अध्यक्ष प्रभाकर झळके यांनी केले तर सुत्रसंचालक नारायण शिंदे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दीपक कासले, मयूर पारवे, गोपाळ गुरगुडे, गोकुळ गांगुर्डे, मुकेश लचके, अक्षय पारवे, नंदू पारवे, आदींनी विशेष परिश्रम घेतले.