शेतकऱ्यांना फसवाल तर तुरुंगात जाल !
येवला :
खरिप हंगामाच्या तोंडावर वरुण राजाने कृपादृष्टी करीत बळीराजाच्या मनाजोगते आगमन केले आहे, पेरणीला सुरुवात देखील झाली आहे कृषी विभागाने खते, बियाणे मुबलक उपलब्ध करुन देतानाच शेतकऱ्यांची फसवणुक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी कंबर कसली आहे.
रासायनिक खते, किटकनाशके बियाणे यामध्ये शेतकऱ्यांची फसवणुक झाल्यास संबंधीत कृषी निविष्ठा विक्रेत्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणे संबंधी सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहे. तालुक्यात विक्री केंद्रावर जादा दराने विक्री होऊ नये कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये यासाठी कृषी सहाय्यकना नजर ठेवण्यासाठी सुचित करण्यात आले आहे. जिल्हा स्तरावरून भरारी पथकांचे गठन करण्यात आले असुन तालुका स्तरावर कृषी विभाग व पंचायत समिमी गुणवता निरीक्षक नियंत्रण ठेवणार आहेत. या सबंधी कुठलीही तक्रार असल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा पंचायत समीती कृषी विभाग यांचे कडे संपर्क साधावा असे आव्हान येवला तालुका कृषी विभागाने केले आहे.
शेतकरी बांधवांनी खते, बियाणे खरेदी करताना मान्यता प्राप्त कृषी सेवा केंद्रातुनच खरेदी कराव्यात खरेदी करतांना त्याच्या पावत्या जपून ठेवाव्यात निविष्ठा खरेदी करतांना पाकीट वरील माहितीचे वाचन करावे व पॅकींग व्यवस्थित असल्याची रात्री करावी बियाणे सोबत आलेल्या बुरशीनाशकची बिजप्रक्रिया पेरणी पूर्वी करावी व जमीनीत आवश्यक योग्य ओलावा आल्यावर पेरणी करावी असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने मंडळ कृषी अधिकारी, अंदरसुल हितेंद्र पगार यांनी केले आहे.