निर्भयपणे मतदान कर्मचारी यांनी जबाबदारी पार पाडावी:बाबासाहेब गाढवे
येवल्यात कर्मचा-यांना निवडणूक प्रशिक्षण
येवला : पुढारी वृत्तसेवा
निर्भयपणे मतदान कर्मचारी यांनी जबाबदारी पार पाडत असतांना हा राष्ट्रीय उत्सव यशस्वीपणे साजरा करावा असे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी केले.शहरातील महात्मा फुले नाट्यगृहात आयोजित प्रशिक्षण
प्रसंगी ते बोलत होते.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या सर्व घटनांवर सूक्ष्म निरीक्षक लक्ष ठेवणार असल्याची माहितीपण प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी दिली. लोकसभा सार्वत्रिक निवडणूकिसाठी विधानसभा मतदारसंघात केंद्र संचालक,मतदान अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या सर्वांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळी श्री गाढवे यांनी विविध सूचना दिल्या. प्रशिक्षणासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, नायब तहसीलदार नितीन बाहिकर, पंकज मगर,निरंजना पराते,विवेक चांदवडकर,श्रीमती हिरे व तहसील कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते. मतदान केंद्रावर निवडणूक प्रक्रियेसंबंधी पार पाडायची कर्तव्य-जबाबदारी याबाबत सर्व निवडणूक कर्तव्यावर नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हस्तपुस्तिकेतील परिशिष्ट २८ मधील नमूद सर्व १८ मुद्द्यांची सखोल माहिती पीपीटी द्वारे देऊन सदर मुद्देनिहाय वस्तुनिष्ठ अहवाल थेट निवडणूक निरीक्षक यांच्याकडे सादर कसा करावा, याबाबत माहिती देण्यात आली.
भारत निवडणूक आयोगाने निर्देशित केल्याप्रमाणे दिवसभरात घडणाऱ्या सर्व निवडणूक प्रक्रियाशी संबंधित घटनांचे विविध अर्ज व पाकिटात अहवाल सादर करून निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडायची आहे.१७{अ}१७{क}कसे भरायचे व सादर करण्याबाबत प्रशिक्षणात सुचित करण्यात आले.
मतदानाच्या दिवशी मॉक पोल, प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया, मतदार प्रतिनिधी, मतदान केंद्रामध्ये मोबाईलचा वापर न करणे, दिव्यांग मतदार, महिला मतदार व जेष्ठ नागरिक याबाबत मतदान केंद्रावर व्यवस्था या गोष्टींचे सविस्तर माहितीपर चित्रफीत यावेळी श्री गाढवे यांचेकडून सादर करण्यात आले.
भारत निवडणूक आयोग हि यंत्रणा या प्रक्रियेमध्ये स्वतंत्र नि:पक्षपातीपणे काम करणारी यंत्रणा असल्याचे बाबासाहेब गाढवे यांनी सांगितले. यावेळी केंद्रप्रमुख व अधिकारी वर्ग यांनी विविध शंका विचारून त्याचे निरसन करवून घेतले.सकाळच्या सत्रात हा प्रशिक्षण वर्ग झाला.तर दुपारच्या सत्रात स्वामी मुक्तानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्रत्यक्ष यंत्र हाताळणी बाबत
कर्मचा-यांचा दुसरा प्राशिक्षण वर्ग घेण्यात आला. VVPAT इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवर मतदान घेण्यात येणार आहे.
कर्मचा-यांना इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनविषयी माहिती यावेळी दिली. एका मतदान केंद्रावर एक मतदान केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी एक साहाय्यक व एक शिपाई अशा पाच कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली असून, विविध क्षेत्रीय अधिकारी नेमण्यात आले आहे. तसेच काही क्षेत्रीय अधिकारी अतिरिक्त राखीव ठेवण्यात येणार असून, एका मतदान केंद्रावर सुमारे400 ते 600 मतदान ठेवण्यात आले आहे. मतदानासाठी माध्यमिक व जि.प.चे प्राथमिक शिक्षक, शासकीय कार्यालयातील कर्मचारी, तर केंद्राध्यक्ष व क्षेत्रीय अधिकारी म्हणून शासकीय अधिका-यांची नेमणूक करण्यात आली आहे. 12 मे रोजी दुसरा प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला आहे.
कर्मचारी यांचेकरिता भोजन, चहा, पाणी याची व्यवस्था निवडणूक शाखेकडून करण्यात आली होती.