वाचन संस्कृती संवर्धनासाठी बालवाचनालय येवल्यातील धडपड मंचच्या वतीने नि:शुल्क उपक्रम

 
वाचन संस्कृती संवर्धनासाठी बालवाचनालय 
येवल्यातील धडपड मंचच्या वतीने नि:शुल्क उपक्रम

येवला : पुढारी वृत्तसेवा

 मुलांवर वाचन संस्कार व्हावेत त्यांना वाचनाची गोडी लागावी, यासाठी गेली २५ वर्षे येवल्यातील धडपड मंच च्या वतीने बालवाचनालय उपक्रम नि:शुल्क चालवला जात आहे. यंदाही १६ एप्रिल १५ जून या कालावधीत सकाळी ८.३० ते १० या वेळेत बालाजी मंदिर येथे बालवाचनालय सुरू झाले असून बालगोपाळांना दररोज नवनवीन पुस्तके आपल्या घरी नेऊन वाचता येणार आहे.

या उपक्रमाचा शुभारंभ डॉ.सागर बोळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नारायण शिंदे, प्रा.दत्तात्रय नागडेकर, पालक सौ. डहाके या उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत लहान वयातच विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे पुस्तके वाचायला मिळाले, तर त्यांच्या जीवनाला एक दिशा मिळते. त्यामुळे वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी सुरु केलेले बालवाचनालय हा अतिशय स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगितले. 

प्रत्यक्ष पुस्तक स्वतः निवडून ते हातात धरून वाचण्याचा आनंद काय असतो, याचा अनुभव  काय असतो हे जाणून घेण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्याला मित्रमंडळी सह बालवाचनालयात पाठवून या उपक्रमास भरघोस प्रतिसाद द्यावा व पाल्यांची उन्हाळी सुटी सत्कारणी लावावी असे आवाहन धडपड मंचचे प्रभाकर झळके यांनी केले.

यावेळी गोपाल गुरगुडे, दत्ता कोटमे, मयूर पारवे, मुकेश लचके, सचिन वखारे, सुनील चारणे, विवेक चव्हाण, वरद लचके, आदीसह पालक उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने