निवडणुकीच्या पवित्र कार्यात कसूर नको प्रांत गाढवे
येवला : पुढारी वृत्तसेवा
सोपविण्यात आलेले कर्तव्य बिनचूक पार पाडा. अधिकारी तुमच्या बरोबर आहे. कर्तव्यात कोणतीही कसूर ठेवू नका, निवडणूक प्रक्रिया राबविणे हे पवित्र कार्य जबाबदारीने पार पाडा. अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागेल, असे आवाहन प्रांताधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी केले. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील निवडणूक मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना दोन दिवस शहरातील विंचूर रोड वरील महात्मा फुले नाट्यगृहात सकाळी ९ ते १ व दुपारी १ ते ३ या दरम्यान १ हजार ६५० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी गाढवे बोलत होते. मतदान केंद्रावर जाण्यापूर्वीपासून ते मतदान प्रक्रिया आटोपल्या नंतर निवडणूक मतदान यंत्र जमा करण्यापर्यंतची प्रक्रिया प्रांताधिकारी गाढवे यांनी समजावून सांगितली. या कामात कुणीही हलगर्जीपणा करू नये, हे राष्ट्रीय काम आहे. हे कार्य विना अडथळा पार पाडणे आपली सर्वांची जबाबदारी आहे. असेही गाढवे यांनी सांगितले. तहसीलदार आबासाहेब महाजन यांनीही मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांनी पाळावयाची आचारसंहिता विषयी मार्गदर्शन केले. शहरातील स्वामी मुक्तानंद विद्यालयातही सकाळी ८ ते दुपारी १ दुपारी १ ते ३ पावेतो नायब तहसीलदार पंकज मगर व त्यांचे सहकारी, गटशिक्षणाधिकारी संजय कुसाळकर शिवाय क्षेत्रीय अधिकारी, मतदान यंत्रे, बॅलेट युनिट, व्हीव्हीपॅट यंत्रासह १३ खोल्यांमध्ये कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेविषयी माहिती देऊन, हे यंत्र एकमेकाला जोडणी, मतदान प्रक्रिया, बॅटरी बदलणे, मॉक ड्रिल मतदान पन्नास पर्यंत करून दाखवणे, असे प्रात्यक्षिकासह समजवण्यात आले. मतदान केंद्रावर पोहोचल्यावर घ्यावयाची काळजी, करावयाची कामे, याविषयी माहिती देऊन निवडणुकीसाठी तैनात असणाऱ्या वाहनातूनच निवडणूक कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांनी प्रवास करावयाचा आहे. या सर्व वाहनांना जीपीएस सुविधा लावण्यात आलेली आहे. असेही प्रांताधिकारी गाढवे यांनी सांगितले. यावेळी मत पडताळणी, दिव्यांगांना सुविधा, अभिरुप मतदान, ५० मतांची मर्यादा, ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदान करिता व्यवस्था, नवीन व्हीव्हीपॅट यंत्र वापर, मतदान यंत्रावर केलेल्या मतदानात व व्हीव्हीपॅट यंत्राच्या प्रिंटमध्ये विसंगती आढळल्यास लागलीच तक्रार करण्याची मुभा आहे. मात्र ही तक्रार चुकीचे सिद्ध झाल्यास नियमानुसार शिक्षेस पात्र होऊ शकते, याविषयी तक्रारदारास अवगत करण्याच्या सूचना आदीबाबत माहिती देण्यात आली. यंत्रा बाबत नायब तहसीलदार विशाल बहिकर, मंडळ अधिकारी जयश्री शेट्ये, आदींनी माहिती दिली.
दोन सत्रामध्ये प्रशिक्षण पार पडले. प्रशिक्षणाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना टपाली मतदान व इडीसी प्रमाणपत्र साठी आवश्यक मतदार यादी अनुक्रमांक शोधण्यासाठी केंद्रस्तरीय मतदान अधिकारी यांच्या मार्फत हेल्प डेस्कची सुविधा करण्यात आली होती. तसेच प्रशिक्षण स्थळी अत्यावश्यक सेवा अंतर्गत वैद्यकीय पथक उपस्थित होते. कर्मचाऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, चहा या सुविधांचे आयोजन करण्यात आले होते.
प्रशिक्षण दिनांकाअगोदर सर्वांना आदेश देण्यात आले होते. तरीही या प्रशिक्षणासाठी ७५ कर्मचारी गैरहजर होते. गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
- : आबासाहेब महाजन, तहसीलदार येवला
फोटो : - निवडणूक कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देताना प्रांत अधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबासाहेब महाजन, नायब तहसीलदार पंकज मगर, गटशिक्षणाधिकारी संजय कुसाळकर आदी.