बिबट्याच्या हल्ल्यात एक जण जखमी

बिबट्याच्या हल्ल्यात एक जण जखमी 

येवला : पुढारी वृत्तसेवा


 तालुक्यातील धानोरे शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात वनविभागाचा कर्मचारी जखमी झाला आहे. बिबट्याच्या शोध सुरू असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या पथकाने प्रयत्न जोरात सुरू केले आहे.


येवला शहरापासून अवघ्या तीन-चार किलोमीटरवर असलेल्या धानोरे या गावातील देविदास शिंदे यांना शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास त्यांच्या गिनी गवताच्या शेतात बिबट्या असल्याचे त्यांना दिसून आले त्यांनी वनविभागाची संपर्क साधला, परंतु वन विभागाच्या तात्काळ दखल घेण्यासाठी त्यांनी शिवसेनेचे नेते संभाजी पवार यांनाही याची माहिती दिली असता संभाजी पवार यांनी तातडीने वनविभागाला तिथे पथक पाठवण्याचे सांगितले. देविदास शिंदे यांच्या गिनी गवताच्या शेतामध्ये बिबट्याचे अस्तित्व खरोखर आहे की नाही हे पाहणी करीत असताना वन विभागाच्या कर्मचाऱ्यावर बिबट्याने डरकाळी फोडून हल्ला करून उसाच्या शेतात पलायन केले. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाकडून पिंजरा जाळी घेऊन जोरदार मोहीम राबवली जात आहे. पाण्याच्या शोधात वन्यप्राणी आता शहराच्या वेशीवर अवघ्या दोन-चार किलोमीटरवर आल्याने शहराच्या आसपासच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण झाले आहे. संबंधित बिबट्याचा शोध घेऊन त्याला तात्काळ वन विभागाने योग्य त्या ठिकाणी पाठवावे अशी मागणी धानोरे येथील ग्रामस्थ करीत आहे.
थोडे नवीन जरा जुने