राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणजे निर्भय बनो"चे चालते बोलते विद्यापीठ
प्रा.डॉ.अलीम वकील
येवला : पुढारी वृत्तसेवा
रोजच्या रोज अनेक संकटांचा सामना करीत त्यावर मोठ्या धाडसाने लिलया मात करणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी हे खरे तर " निर्भय बनो "या विचारांनी माणसांची जडणघडण करणारे चालते बोलते विद्यापीठ होते,असे गौरोउद्गार महात्मा गांधींच्या विचाराचे अभ्यासक,प्रसिद्ध साहित्यिक प्रा.डॉ.अलीम वकील यांनी येवले येथे बोलताना काढले.
येथील समता प्रतिष्ठान या संस्थेने महात्मा गांधीजींच्या स्मृति दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या "महात्मा गांधी वसाहतवाद विरोधापासून, विभाजनवाद विरोधापर्यंत"या विषयावरील व्याख्यानात प्रा.डॉ.अलीम वकील बोलत होते,कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक आणि राष्ट्रसेवा दलाचे जेष्ठ कार्यकर्ते प्रा. मारुतीराव लामखडे हे होते.
सुरुवातीला मायबोली निवासी कर्णबधिर विद्यालयातील मूकबधिर मुलांनी" दे दी तुने आजादी खडग विना ढाल!साबरमती के संत तुने कर दिया कमाल !!" या गीतावर अतिशय सुंदर असे नृत्य सादर उपस्थितांची मने जिंकली. या गीतानंतर समता प्रतिष्ठानच्या कनिष्ठ महाविद्यालयातील वैष्णवी साताळकर आणि समृद्धी कोकाटे या दोन विद्यार्थिनींनी,"तरीही गांधी का मरत नाही ?"ही कविता सादर केली.
समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.अर्जुन कोकाटे यांनी प्रास्ताविक करताना अलीकडच्या काही दिवसात महात्मा गांधीजींच्या विचारांची कास धरून धरण्यापेक्षा गांधीजींच्या विचारांना उघड उघड विरोध करण्याची भाषा आणि कृती होताना दिसत असल्यामुळे खेद व्यक्त केला. वास्तविक महात्मा गांधीजींनी सांगितलेल्या" नई तालीम " या शिक्षण पद्धतीची अंमलबजावणी झाली असती तर,आज शिक्षण क्षेत्रा बरोबरच गाव खेड्याचे चित्र देखील बदललेले दिसले असते,मात्र तसे न घडल्यामुळे आज ग्रामीण भागातील जनमानस प्रचंड अस्वस्थ असल्याचे स्पष्ट केले.
*त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्रा. मारुतीराव लामखडे म्हणाले, आपल्या भारतातच नव्हे तर जगातील सुमारे 600 विद्यापीठांमध्ये महात्मा गांधीजींच्या विचारांवर अभ्यासक्रम शिकवला जात असून महात्मा गांधीजींचे हजारो पुतळे देश विदेशात उभे करून लोक गांधी विचाराला आळवीत असतात, मात्र सध्याच्या भारताच्या नेतृत्वाने महात्मा गांधी म्हणजे केवळ सफाई क्षेत्रातील कामाचा माणूस असे चित्र निर्माण करून त्यांच्या विचारांपासून फारकत घेण्याचे उद्योग सुरू केले आहेत*. *गांधीजींचा प्रत्यक्ष गोळ्या घालून खून करणाऱ्या नथुरामाची मंदिरे बांधली जात असून हे या देशाच्या वैचारिक दिवाळखोरीचे लक्षण असल्याचेही प्रा.लामखडे यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी आपल्या विषयावर मांडणी करताना प्रा.डॉ.अलीम वकील म्हणाले, भारताच्या विभाजनास गांधीजींना जबाबदार धरणारा एक खास हिंदुत्ववादी गट या देशात गांधीजींची हत्या केल्यापासून प्रयत्न करीत आहे, गांधीजींनी मुस्लिमांचा केलेला अनुनय हे विभाजनाचे मुख्य कारण असल्याचा दावा हा गट सातत्याने करीत असतो.याच गटाला इंग्रजांपेक्षाही भारतातील मुसलमानांपासून जास्त धोका असल्याचे सातत्याने वाटत आले आहे. असे स्पष्ट करून प्रा.डॉ. वकील म्हणाले,त्यांची ही भीती कायमस्वरूपी अनाठाई होती आणि आहे,भारतात हिंदू जितक्या प्राचीन काळापासून राहतात तितक्याच प्राचीन काळापासून मुसलमानही राहत आहेत, शिवाय इथले मुसलमानही पूर्वी हिंदूच होते,या वास्तवाकडे हा गट हेतूत: डोळेझाक करून करीत आला असून गांधीजी मात्र त्याकडे डोळे उघडून पहा,असा आग्रह धरत होते.गांधीजी विभाजनाच्या विरोधात होते. तत्कालीन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही हिंदू मुस्लिम ऐक्याचा प्रयत्न करणारे ते एकमेव निर्भय नेते होते.गांधीजी नेहमीच आपल्या विचारांशी प्रामाणिक राहत होते.भारतातील अस्पृश्यता निवारण्याचा त्यांचा प्रयत्नही अत्यंत प्रामाणिक होता.आपल्या विचारांशी आणि आचारांशी प्रामाणिक राहिल्यामुळेच त्यांच्याविषयी अनेक समज गैरसमज पसरविण्यात आले,मात्र त्यांनी वेळोवेळी आपल्या कृतीतून हजारो निर्भय कार्यकर्त्यांची फळे निर्माण करून त्या सर्व अक्षेपांना वेळोवेळी चोख उत्तरे दिल्याचा इतिहास सर्वांना ज्ञात आहे. गांधीजी हे फक्त हिंदूंचे नेते आहेत,हे त्यांना कधीच मान्य नव्हते,ते कुणाचे म्हणून खास प्रतिनिधी करीत नसले तरी भारतातील सर्व रहिवाशांचे प्रतिनिधित्व करण्याची त्यांची तीव्र इच्छा त्यांच्या अनेक लढ्यांमधून जगासमोर आलेली आहे.सर्वांचे दुःख,दुर्दशा,समस्या एकच आहेत, आणि म्हणून आपण सर्वांनी म्हणजे हिंदू,मुसलमान,ख्रिश्चन,जैन आदींनी एकमेकांशी उत्तम भाईचारा ठेवूनच वागले पाहिजेत. संबंध ठेवले पाहिजेत,अशी उत्कट इच्छा गांधीजींनी आपल्या ऊक्ती आणि कृतीतून नेहमीच दाखवून दिली आहे,असेही मत प्रा.डॉ.अलीम वकील यांनी शेवटी स्पष्ट मांडले.
याप्रसंगी कॅनडा स्थित महाराष्ट्र सेवा समिती ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष जीवन काका कायंदे, अहमदनगर जिल्हा राष्ट्रसेवा दलाचे कार्याध्यक्ष अडवोकेट समीर लामखडे, ज्येष्ठ नेते अजिज भाई शेख,संस्थेतील सर्व शिक्षक प्राध्यापक आवर्जून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनकर दाणे आणि बाबासाहेब कोकाटे यांनी केले तर मुख्याध्यापक नवनाथ शिंदे यांनी आभार मानले.