नमो तीर्थस्थळ सुधार अभियानात चिचोंडी राघवेश्वर महादेव मंदिराचा समावेश
नमो तीर्थस्थळ सुधार अभियानातून होणार चिचोंडी राघवेश्वर महादेव मंदिर तीर्थ क्षेत्राचा विकास
येवला : पुढारी वृत्तसेवा
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून नमो तीर्थस्थळ सुधार अभियान ७३ पवित्र व ऐतिहासिक धार्मिक स्थळांची सुधारणा करणे या योजनेअंतर्गत येवला तालुक्यातील चिचोंडी येथील राघवेश्वर महादेव मंदिर या तीर्थ स्थळाची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटन विकासाच्या माध्यमातून या तीर्थ स्थळाचा विकास करण्यात येऊन परिसरातील पर्यटनात अधिक वाढ होणार आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त विविध लोकोपयोगी नमो ११ सूत्री कार्यक्रम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये ११ विविध अभियान राबविण्यात येत असून यामध्ये 'नमो तीर्थस्थळ सुधार अभियान' राबविण्यात येत आहे. यामध्ये राज्यातील ७३ पवित्र ऐतिहासिक धार्मिक स्थळांची सुधारणा करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला तालुक्यातील चिचोंडी येथील राघवेश्वर महादेव मंदिर या ऐतिहासिक मंदिराचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच या अभियांअंतर्गत चिचोंडी राघवेश्वर महादेव मंदिराचा तीर्थ क्षेत्राचा विकास होऊन येथील पर्यटनात अधिक वाढ होणार आहे.