येवला साहित्य संमेलन बोधचिन्हाचे अनावरण संपन्न



येवला साहित्य संमेलन बोधचिन्हाचे अनावरण संपन्न

येवला :  पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा येवला यांचे वतीने दिनांक- 25 व 26 नोव्हेंबर 2023 रोजी होऊ घातलेल्या साहित्य संमेलनाच्या बोध चिन्हाचे अनावरण सुप्रसिद्ध कवी तथा गीतकार प्रकाश होळकर व येवल्याचे तहसीलदार तथा साहित्यिक आबा महाजन यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी बोलताना साहित्यिक आबा महाजन यांनी येवल्यातील विविध साहित्यिक व सांस्कृतिक उपक्रमांचा उल्लेख करून आपल्या आयुष्यात येथील आठवणी संस्मरणीय राहतील असे सांगितले. कवी प्रकाश होळकर यांनीही या बोध चिन्हात येवल्याच्या विविध सांस्कृतिक पैलूंचा समावेश करण्यात आल्याबद्दल बोधचिन्हाचे कलावंत प्रा. सतीश विसपुते यांचा गौरव केला. येवल्यातील साहित्य संमेलन भव्य दिव्य होईल अशी अपेक्षा व्यक्त करून  सर्व येवलेकरांनी या साहित्य संमेलनात सक्रिय सहभागी व्हावे असे आवाहन केले. साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष विक्रम गायकवाड यांनी याप्रसंगी साहित्य संमेलनाच्या सर्व पूर्वतयारीचा आढावा घेतला. 
प्रास्ताविक प्राचार्य डॉ. बाबासाहेब गमे यांनी केले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा तसेच बोधचिन्ह तयार करणारे प्रा. विसपुते यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.  सूत्रसंचालन बाळासाहेब सोमासे यांनी केले तर लक्ष्मण बारहाते यांनी आभार मानले. 
कार्यक्रमास साहित्य परिषदेचे अध्यक्ष सूर्यकांत सस्कर, प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाजीराव सोनवणे, शंकर अहिरे, निर्मलाताई कुलकर्णी, सुवर्णा चव्हाण, अस्मिता गायकवाड, योगेंद्र वाघ, माधवराव गंगापूरकर, प्रा. शरद पाडवी, प्रा. बाळासाहेब हिरे, सचिन साताळकर, रतन पिंगट, दत्तकुमार उटावळे, अरुण भावसार, सुनील गायकवाड, सचिन कळंबे आदींसह साहित्य परिषदेचे सभासद उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने