येवल्यातील मंडलाधिकारी नऊ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडला
येवला : पुढारी वृत्तसेवा
येवल्यातील मंडलाधिकारी आणखी एका व्यक्तीसह लाच स्विकारताना रंगेहाथ पकडला गेला आहे.
पांडुरंग हांडू कोळी असे संबंधित मंडलाधिकाऱ्याचे नाव असून ते येवल्यातील मौजे सावरगाव येथे कार्यरत आहे.शासनाच्या लक्ष्मी मुक्ती योजनेंतर्गत तक्रारदाराच्या आईचे नाव वडिलांच्या सातबाऱ्यावर लावण्याच्या मोबदल्यात नऊ हजारांची लाच घेताना लातलुचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या सापळ्यात तो अडकला.
तक्रारदाराच्या आईचे नाव शासनाच्या लक्ष्मी मुक्ती योजनेंतर्गत वडिलांच्या सातबाऱ्यावर लावायचे असल्याने त्याने कोळी यांच्याशी संपर्क साधला. या कामापोटी तक्रारदाराकडे १५ हजारांची लाच मागण्यात आली. तडजोडीअंती नऊ हजारांची रक्कम देण्याचे ठरले. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात येवून कोळी यांचेसह विठोबा जयराम शिरसाठ या खाजगी व्यक्तीला रंगेहाथ पकडण्यात आले. या दोघांविरोधात येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सदर कारवाई नाशिक परिक्षेत्राच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाच्या वतीने करण्यात आली.