शालेय शिक्षणास तंत्रज्ञानाची जोड देवून विद्यार्थ्यांनी आधुनिक कौशल्ये आत्मसात करावी : मंत्री छगन भुजबळ
येवला : पुढारी वृत्तसेवा
सध्याचे युग हे विज्ञानाचे व आधुनिक तंत्रज्ञानाचे आहे. नवनवीन तंत्रज्ञान अविष्कार व होणारे बदल लक्षात घेता विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय शिक्षणास तंत्रज्ञानाची जोड देवून आधुनिक कौशल्ये आत्मसात करावी, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
येवला तालुक्यातील शिरसगाव (लौकी) येथील जय योगेश्वर माध्यमिक विद्यालयात केंद्र शासनाच्या निधीतून उभारलेल्या अटल टिंकरीग लॅबचे उद्धाटन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी मंत्री छगन भुजबळ बोलत होते.
यावेळी वेळी माजी आमदार मारोतीराव पवार, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, प्रांत अधिकारी बाबासाहेब गाढवे, निवासी नायब तहसिलदार मगर, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, संस्थेचे अध्यक्ष शिवाजी भुले, उपाध्यक्ष ॲड.एकनाथ भुले, सचिव भोलानाथ लोणारी, डॉ.प्रवीण भुले, ज्ञानेश्वर शेवाळे, मुख्याध्यापक सुधाकर शेलार यांच्यासह शिक्षक वृंद, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, निधी आयोग व अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत २२ लाख रूपयांच्या अनुदानातून साकारलेल्या अटल टिंकरींग लॅबचे आज उद्धाटन झाले आहे. आज या लॅबच्या उद्घाटनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी साकारलेल्या तांत्रिक बाबी व त्यात रममाण झालेले विद्यार्थी पाहून मनस्वी आनंद वाटला. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी सतत नवीन गोष्टी शिकण्याचा ध्यास ठेवला पाहिजे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या थोर व्यक्ती व शैक्षणिक योगदान दिलेल्या महत्वपूर्ण व्यक्तींचे योगदानांची व त्यांचा आदर्श याबाबतची माहिती विद्यार्थांना अवगत असणे आवश्यक आहे. संविधानाने सर्वांना समान शिक्षणाचा हक्क बहाल केला त्यामुळे मुलांसोबतच मुलींनाही उच्च शिक्षणासाठी पालकांनी प्रोत्साहन देण्याचे आवाहन मंत्री श्री.भुजबळ यांनी यावेळी उपस्थित ग्रामस्थांना केले.
यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी जय योगेश्वर माध्यमिक विद्यालयास अत्याधुनिक लॅबसाठी २२ लाखांचा निधी, अभ्यासिकेसाठी रू. १० लाख व दिवंगत जेष्ठ लेखक व विचारवंत प्रा.हरि नरके यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रूपये ५ लाखांचा निधी शाळेच्या विकासकामासाठी घोषित केला.
सुरवातीला मंत्री छगन भुजबळ यांनी फित कापून अटल टिंकरींग लॅबचे उद्घाटन करून लॅबची पाहणी करत विद्यार्थ्यांनी संवाद साधला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव भोलाशेठ लोणारी यांनी केले.