मोफत पंढरपूर वारीत
पाच हजार वारकरी विठूरायाच्या दर्शनाला!
आमदार दराडे बंधूंच्या पुढाकाराने येवल्यातून १०० बसमधून मोफत पंढरीची वारी
येवला : पुढारी वृत्तसेवा
ऐसी चंद्रभागा ऐंसे भीमातीर । ऐसा विटेवर देव कोठें ।। ऐसे संतजन ऐंसे हरिदास । ऐसा नामघोष सांगा कोठे ।। या अभंगाची यथार्थता पटवून देत येथून सुमारे ९० ते १०० बस भरून चार ते पाच हजार विठ्लाचे वारकरी आज आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या चरणी लिन होण्यासाठी पंढरपूरला रवाना झाले.वारकऱ्यांसाठी आमदार नरेंद्र दराडे व आमदार किशोर दराडे यांच्या पुढाकाराने या मोफत बसची व्यवस्था करण्यात आली असून भोजन,फराळ,
आरोग्यसेवेसह पंढरपूर येथे मठामध्ये राहण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
आषाढी एकादशीनिमित्त तालुक्यातील भाविकांसाठी मोफत दर्शनवारीचे कुणाल दराडे फाउंडेशनच्या पुढाकाराने आयोजन करण्यात आले होते.यासाठी नावनोंदणी करण्यात आली होती.आज सकाळी पंढरपूर येथे जाण्यासाठी जमलेल्या हजारों भाविकांच्या उपस्थितीत शहराच्या मुख्य मार्गावरून विठू नामाचा जयघोष करत दिंडी काढण्यात आली.वडगाव येथील हभप भाऊसाहेब जाधव महाराज यांच्यासह त्यांच्या ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेतील चिमुकल्यांनी भजनांचे गायन केले.यावेळी गोरखमहाराज कुदळ,हभप जाधव महाराज यांनी विठ्ठल भ्कताना मार्गदर्शन केले.संत नामदेव महाराज तसेच विठ्ठल-रुखुमाईच्या मंदिरात दर्शन घेण्यात आले. आमदार किशोर दराडे,कुणाल दराडे आदि टाळ हातात घेऊन नामस्मरण करत दिंडीत सहभागी झाले होते.स्वतः आमदार नरेंद्र दराडे व किशोर दराडे बंधू,कुणाल दराडे तसेच मीना दराडे यांनी वारकऱ्यांचे स्वागत केले.दिंडी आसरा लान्स येथे आल्यावर प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे,तहसीलदार आबा महाजन,प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी श्री.क्षिरसागर,पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम यांच्या हस्ते संत पूजन करण्यात येऊन वारीला सुरुवात करण्यात आली.या वारकऱ्यांसोबत स्वतः आमदार किशोर दराडे व मीना दराडे पंढरपूर येथे गेले आहे.वारकरी भाविक भक्तांसाठी प्रत्येक बसमध्ये प्राथमिक उपचारासाठी डॉक्टर, औषधोपचाराचीही व्यवस्था करण्यात आली असून यासाठी २०० वर स्वयंसेवक सोबत गेलेले आहे.
आज दुपारी करमाळा येथे भोजन तसेच पंढरपूर येथे राहण्याची, जेवण व फराळाची आणि प्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.विशेष म्हणजे गुरसाळे (पंढरपूर) येथे मातोश्री आसराबाई दराडे मठ उभारण्यात आला असून या ठिकाणी या सर्व भाविक भाविकांसह येवला,लासलगाव परिसरातून गेलेल्या सर्व दिंड्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.उद्या एकादशीच्या निमित्ताने या मठात दहा हजारावर भाविकांसाठी खिचडी वाटपाचे ही नियोजन करण्यात आल्याची महिती कुणाल दराडे यांनी दिली.पंढरपूरकडे बसमधून भाविक रवाना होताना किराणा व्यापारी असोसिएशन तसेच कापसे फाउंडेशनचे सर्वेसर्वा बाळासाहेब कापसे,दत्ता निकम,नगरसेवक प्रमोद सस्कर,बंडू शिरसागर आदींनी फराळ वस्तूंचे वाटप केले.यावेळी विठ्ठलअण्णा शेलार,पोटे महाराज,अमोलमहाराज कोटमे,डॉ.सुधीर जाधव,संजय कासार, दिनेश आव्हाड,नितीन काबरा,हरिष मुंढे,सुनील पवार, समाधान झाल्टे,प्रसाद गुब्बी,सुनील काटवे आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
"वारकरी संप्रदायात विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ आजही प्रत्येकाच्या मनात असते,मात्र ग्रामीण भागातील भक्तांना अनेक अडचणी असतात.आषाढी एकादशीच्या पवित्र दिनी भाविकांच्या दर्शनाची सोय व्हावी व त्यासाठी आपणही शक्य ती सेवा येवलेकरांसाठी करावी या हेतूने सर्व भाविकांना मोफत दर्शनासाठी घेऊन जाण्याचा हा उपक्रम राबविला आहे.देवाच्या दर्शनाला भाविकांना घेऊन जाण्याचे आमच्या आईचे स्वप्न यानिमित्ताने दराडे बंधूनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे."
- किशोर दराडे,आमदार,येवला
येवला : येथून पंढरपूरला बस रवाना होण्यावेळी नामस्मरणात सहभागी झालेले आमदार नरेंद्र दराडे,आमदार किशोर दराडे,कुदळ महाराज,जाधव महाराज,कुणाल दराडे व वारकरी.