ममदापुर वन संवर्धन राखीव मुळे 'देवनाचा' आणि ममदापुर साठवण तलाव अडचणीत
प्रकल्पांचा खर्च दुपटीने वाढला
निविदा घेण्यास ठेकदारही मिळेना
प्रकल्प रद्द होण्याच्या शक्यतेने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट
येवला : पुढारी वृत्तसेवा
ममदापुर येथे वन संवर्धन राखीव झाल्याने वन्य प्राण्यांना दिलासा मिळाला असल्याचे सांगितले जाते..
मात्र याच वन संवर्धन राखीव मूळे ममदापुर साठवण तलाव आणि देवदरी येथील देवनाचा सिंचन प्रकल्पा पुढील अडचणी वाढल्या आहेत.
या दोन्ही प्रकल्पासाठी 100 हेक्टर वन जमीनीची आवश्यकता आहे.
वन संवर्धन राखीव झाल्याने लगतच्या जमीनीचे निव्वळ सध्याचे मूल्य ( नेट प्रेजेंट व्हॅल्यू ) पाच पटीने वाढले आहे.
ममदापुर साठवण तलावा साठी 28 हेक्टर जमीनी साठी जिथे 1 कोटी रुपये खर्च येणार होता तो वाढून 5 कोटी इतका झाला आहे.
6 कोटी 45 लाख इतकी प्रशासकीय मान्यता मिळाली असताना त्यातील 5 कोटी वन जमिनीसाठी जर मोजावे लागणार असतील तर प्रकल्पाची किमंत दहा कोटीच्या वर जाणार आहे...
त्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता घ्यावी लागणार आहे.
होणारा एकूण पाणी साठा आणि वन खात्याने वाढवलेली किंमत यामुळे प्रकल्पाचे लाभ व्यय गुणोत्तर कमी होऊन प्रकल्प अव्यवहार्य होणार आहेत.
अशा परिस्थितीत प्रकल्प रद्द होऊ शकतो.
देवनाचा साठवण तलावासाठी 12 कोटी 77 लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली असली तरी बांधकाम खर्च आणि वनखात्याची देय रक्कम याचा विचार करता निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यास ठेकेदारही मिळत नसल्याचे समोर आले आहे.
बाजारमूल्य, वाहतूक मूल्य, जमीन मोबदला , प्रत्यक्ष बांधकाम खर्च वाढल्याने सर्वच प्रकल्पांचे लाभ व्यय गुणोत्तर बिघडले आहे.
ममदापुर साठवण तलावाचे भूमिपूजन होऊन 9 वर्ष झाली तरी कणभर माती देखील अजून हललेली नाही.
सुधारित प्रशासकीय मान्यता मिळविण्यासाठी वर्षां नू वर्षे निघून जातात, किंमत वाढत जाते या दुष्ट चक्रात सिंचन प्रकल्प अडकले
स्थानिक नागरिकांचा राखीव वन संवर्धनला विरोध होता. तत्कालीन वन मंत्री, प्रधान मुख्य वन संरक्षक नागपूर यांना लेखी विरोध कळवला होता.
मात्र तत्कालीन प्रधान सचिव प्रविणसिंह परदेशी यांनी वन संवर्धन राखीव मूळे सिंचन प्रकल्प अडचणीत येणार नाही याची ग्वाही दिल्याने स्थानिक नागरिकांनी वन संवर्धन राखीव करण्यास विरोध केला नाही...
ममदापुर तलावाच्या कार्यारंभ आदेशाचे काय होणार ?
ममदापूर साठवण तलावाच्या ६ कोटी ४५ लक्ष रुपये निधीच्या कामासाठी कार्यारंभ आदेश नुकतेच देण्यात आले आहेत, मात्र वन खात्याने विशेष सवलत न दिल्यास प्रकल्प अव्यवहार्य ठरणार आहे.
ममदापुर येथील वन्य जीवांसाठी संरक्षित वनक्षेत्र क देवनाचा सिंचन प्रकल्प व ममदापुर साठवण बंधार्यासाठी अडसर ठरू लागल्याने प्रस्तावित सिंचन प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील गावां मधील शेतकर्यांत संतापाची लाट उसळली आहे.
या भागातील रहाडी, खरंवंडी, देवदरी, ममदापुर, भारम , कोळम खु., कोळम बु., रेंडाळे, न्याहारखेडे खु. जायदरे, लहित, हडपसावरगांव , राजापुर, सोमठाणा जोश, वाईबुथी, कोळगांव, सायगांव, नगरसूल आदि गावातील शेतकरी एकत्र येऊन वनखात्याच्या विरोधात संघर्ष करून जमीन हस्तांतरण मूल्य शुन्य करणे गरजेचे आहे.
देवदरी येथील ६५ दशलक्ष घनफुट क्षमतेचा देवनाचा सिंचन प्रकल्प व ममदापुर येथील ३७ दशलक्ष घनफूट क्षमतेचा साठवण बंधारा हे साठवण प्रकल्प मृगजळ ठरतील
" गेल्या ४० वर्षांपासून दुष्काळी येवला तालुक्यातील उत्तर पुर्व भागातील कोरडवाहू भागातील शेती सिंचनाचा आणि पेय जलाचा प्रश्न सुटलेला नाही. सिंचनाच्या अभावा मुळे उस तोडणी साठी स्थलांतर करावे लागते आणि पोराबाळांच्या शिक्षणाची आबाळ होते. देवनाचा प्रकल्प आणि ममदापुर बंधारा ही आमची शेवटची आशा आहे. दोन्ही प्रकल्पासाठी प्रचंड पाठपुरावा केला आहे. जर त्यावरच कोणी प्रश्न चिन्ह निर्माण करत असतील आम्हाला आत्मदहन करावेच लागेल " ---- भागवतराव सोनवणे - येवला तालुका जलहक्क संघर्ष समिती.