अलनिनोच्या प्रभावामुळे ऑगस्ट २०२३ पर्यंत पाणी वापराचे नियोजन करावे - छगन भुजबळ





अलनिनोच्या प्रभावामुळे ऑगस्ट २०२३ पर्यंत पाणी वापराचे नियोजन करावे -  छगन भुजबळ



येवला : पुढारी वृत्तसेवा
अलनिनोच्या प्रभावामुळे ऑगस्ट २०२३ पर्यंत पाणी वापराचे नियोजन व त्यादृष्टीने आवश्यक ती तयारी करण्याच्या सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.


येवला तालुका खरीप पूर्व तयारी व टंचाईबाबत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत आज येवला संपर्क कार्यालयात आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते 


यावेळी तहसीलदार आबा महाजन, मुख्याधिकारी नागेंद्र मुत्केकर, गटविकास अधिकारी अन्सार शेख,सहायक निबंधक प्रताप पाडवी, महावितरणचे श्री.बारसे, श्री. जगताप, श्री. जाधव, शहर अभियंता जनार्दन फुलारी, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता श्री.कुलकर्णी, पालखेडचे सहायक अभियंता अमोल शिरोडकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.


यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, अलनिनोचा प्रभाव लक्षात घेऊन आगामी काळात पाण्याचे नियोजन करण्यात यावे. तालुक्यातील ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील त्या गावांमध्ये तातडीने पाण्याचे टँकर उपलब्ध करून द्यावे. पिण्याच्या पाण्याबाबत कुठलीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. तसेच एकही नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहता कामा नये अशा सूचना त्यांनी दिल्या.


ते म्हणाले की, तालुक्यातील खरीप हंगाम लागवडीसाठी आवश्यक बियाणे, खते यांचा मुंबलक प्रमाणात स्टॉक करण्यात यावा. कुठल्याही परिस्थितीत खतांची व बियाणांची कमतरता शेतकऱ्यांना भासणार नाही याचे नियोजन करण्यात यावे. शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेवर उपलब्ध करून देण्यात यावे अशा सूचना त्यांनी दिल्या.


यावेळी त्यांनी महावितरण, येवला शहर स्वच्छता यासह विविध प्रश्नांचा आढावा घेतला. अडतीसगाव पाणी पुरवठा योजनेच्या अडचणी दूर करण्यासोबत लासलगाव विंचूरसह सोळागाव पाणी पुरवठा योजनेची कामे पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. तसेच राजापुरसह ४१ गाव पाणी पुरवठा योजना व धुळगाव सह सोळागाव पाणी पुरवठा योजनेच्या सुरू असलेल्या कामाचा आढावा घेऊन कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.


*शासन आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शेतकऱ्यांना मदतीचे वाटप*


महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना व येवला शहरात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले नागरिकांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी तहसीलदार आबा महाजन, मुख्याधिकारी नागेंद्र मुत्केकर, गटविकास अधिकारी अन्सार शेख यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने