घरकुलासाठी जागेसह रेशनकार्ड,जातीच्या दाखल्यासाठी निदर्शने
येवल्यात एकलव्य आदिवासी परिषद संघटनेच्या टायगर फोर्स ग्रुपच्या वतीने मागणी
येवला : पुढारी वृत्तसेवा
आदिवासी बांधवांना घरकुलासाठी जागा उपलब्ध करून द्यावी,जातीचे दाखले,रेशन कार्ड, आधार कार्ड मिळावे आदी मागण्यासाठी एकलव्य आदिवासी परिषद संघटनेच्या टायगर फोर्स ग्रुपच्या वतीने मोर्चा काढण्यात येऊन निदर्शने करण्यात आली.
प्रारंभी विंचूर चौफुलीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढत येथे जाऊन घोषणाबाजी केली.यावेळी येवला तालुकाध्यक्ष नामदेव पवार यांच्या वतीने तहसीलदार आबा महाजन यांना निवेदन देण्यात आले. यापूर्वी आमच्या आंदोलनाची दखल घेऊन तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते.आश्वासनावर आम्ही आंदोलनही मागे घेतले होते मात्र त्याची पूर्तता न झाल्याने पुन्हा आंदोलनाची वेळ आल्याचे निवेदनात म्हटले आहे.
येवला तालुक्यातील मानोरी, महालखेडा,कोटमगाव,जायदरे, नेउरगाव,सत्यगाव येथे आदिवासी बांधवाना घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी तसेच पिण्याचे पाणी वीज पुरवठा आदी प्रश्न मार्गी यावावे.याशिवाय रेशनकार्डवर धान्य मिळण्यासाठी रेशनकार्ड ऑनलाइन करण्यात यावे. जातीचे दाखले, आधारकार्ड, नवीन रेशनकार्ड, निराधार योजना प्रकरणासाठी गावपंचनामा ग्राह्य धरावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.यावेळी उपस्थित आदिवासी बांधवांनी तहसील कार्यालय परिसरात जोरदार निदर्शने केली.यावेळी संघटनेचे पदाधिकारी संस्थापक अध्यक्ष मंगेश औताडे,जील्हाध्यक्ष सागर माळी,जिल्हा संघटक प्रकाश शिंदे, तालुका अध्यक्ष कैलास पवार, नामदेव पवार,किरण पवार, समाधान पवार,अनिल माळी,प्रमोद राणा,शरद रावल आदी पदाधिकारी
व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो
येवला : विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालय बाहेर घोषणाबाजी करताना पदाधिकारी व कार्यकर्ते.