पालिकांच्या प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी
आमदार दराडेकडून जिल्ह्यातील पालिकांना ३०० संगणक व प्रिंटर
येवला : पुढारी वृत्तसेवा
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरपालिका व महानगरपालिकाचे कामकाज पूर्णत संगणीकृत झाले आहे.मात्र जुनाट व नादुरुस्त संगणक,प्रिंटरची अडचण भेडसावत असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार नरेंद्र दराडे यांच्या निधीतून जिल्ह्यातील दोन्ही महापालिकांसह १७ नगरपालिका व नगरपरिषदांना तब्बल १५० संगणक,१५० प्रिंटर व २९ झेरॉक्स मशीन देण्यात आले आहे.आज येथून या वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.
महानगरपालिका व नगरपालिकांतून लेआउट, विकासकामांचे ठराव,जन्ममृत्यूचे दाखले यासह प्रत्येक काम संगणीकृत झाले आहे.मात्र शासनाकडून संगणक व तत्सम साहित्य खरेदीसाठी मर्यादित स्वरूपात अनुदान मिळते, संगणकाची गरज जास्त मात्र साहित्याची उपलब्धता कमी असल्याने अनेक पालिकांकडून आमदार निधीतून हे साहित्य मिळण्याची मागणी आमदार दराडे यांच्याकडे झाली होती.त्याची दखल घेऊन हे संगणकीय साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. नाशिक नगरपालिकेला ४५ संगणक व ४५ प्रिंटर तर पाच झेरॉक्स मशीन देण्यात आले आहे. मालेगाव महापालिकेलाही पंधरा संगणक व १५ प्रिंटर तसेच तीन झेरॉक्स मशीन देण्यात आले आहे.
याशिवाय येवला,मनमाड,नांदगाव, सटाणा,देवळा,कळवण,दिंडोरी, चांदवड,निफाड,सिन्नर,देवळाली, भगूर,त्रंबकेश्वर,इगतपुरी,सुरगाणा, पेठ व ओझर या नगरपालिका व नगरपरिषदेला तीन ते दहाच्या दरम्यान संगणक,प्रिंटर व एक ते दोन झेरॉक्स मशीन उपलब्ध करून दिले असून सुमारे दोन कोटी दहा लाख रुपयांचा निधी यासाठी खर्च करण्यात आला आहे.यामुळे सर्वच नगरपालिकांचे कामकाज संगणीकृत अध्यायावत होणार असून प्रशासकीय कामकाजांना गती मिळणार असल्याचा विश्वास आमदार दराडे यांनी बोलताना व्यक्त केला.
● येवला नगरपालिकेत शुभारंभ!
विधापारिषद आमदार नरेंद्र दराडे यांच्या विकासनिधीतून येथील नगरपरिषद कार्यालयास १० संगणक संच,१० प्रिंटर व ३ झेरोक्स मशीनचे वितरण आज करण्यात आले.आमदार दराडे यांच्या हस्ते हे संगणक व साहित्य वितरण करण्यात आले.प्रशासक तथा मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी कार्यालयीन कामकाजाला गती देण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल यावेळी आमदार दराडे यांचे आभार मानले.यावेळी माजी नगराध्यक्ष बंडू क्षिरसागर,छाया क्षिरसागर,माजी नगरसेवक दयानंद जावळे यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
"नागरिक विविध स्वरूपाचे अनेक कामे महानगरपालिका व नगरपालिकांमध्ये घेऊन येतात.मात्र अनेकदा या कामांना अडथळेही येतात.त्यामुळे जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधी व अधिकार्यांनी ही अडचण व्यक्त केली होती.त्यामुळे
अत्याधुनिक पद्धतीने काम जलद व्हावे,नगरपरिषदेचा कार्यभार संगणीकृत होऊन प्रशासकीय कामाला गती मिळावी,नागरिकांचे कामे वेळेत व्हावेत यासाठी कार्यालयांना संगणक व प्रिंटर उपलब्ध करून दिले आहे."
- नरेंद्र दराडे,आमदार,येवला
फोटो
येवला : येथील नगरपालिकेत संगणक व प्रिंटर चे वितरण मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांना करताना आमदार नरेंद्र दराडे.