कुसमाडी वनबंधार्‍याच्या दुरूस्तीचे काम वेगात अवघ्या आठवड्याभरात ५१ लाख लिटरची मजल




कुसमाडी वनबंधार्‍याच्या दुरूस्तीचे काम वेगात
अवघ्या आठवड्याभरात 
५१ लाख लिटरची मजल

येवला  : पुढारी वृत्तसेवा
उन्हाचा तडाखा सर्वत्र भडकलेला असताना अल्प पर्जन्यछायेत गणल्या जाणार्‍या येवल्याच्या कुसमाडी वनतळ्याच्या गाळमुक्ती अभियानाने अवघ्या आठवड्या भरात दमदार मजल मारली असून त्यामुळे वन बंधार्‍याची साठवण क्षमता एकावन्न लाख लिटर्सनी आता पर्यत वाढली आहे. या निमीत्त अक्षयतृतीयेला कुसमाडीत ठिकठिकाणहून आलेल्या जिज्ञासूंची वर्दळ बघायला मिळाली.

'राज्य शासनाच्या चला जाणूया नदीला', अभियानात समाविष्ट करण्यात आलेल्या १०८ नद्यांमध्ये येवल्याच्या सुळेश्वर डांगरात उगम पावणार्‍या मोती नदीचा समावेश झाला असून त्यामार्फत नदीचे दु:ख जाणून घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे, त्याचे काम सुरू होण्याच्या बेतात असतानाच कुसमाडी ग्रामस्थांनी यंदाच्या उन्हाळ्यात नदीचा परिसर गाळमूक्त करण्यासाठी साकडे घातले होते. त्यास अनूसरून कुसमाडी वनबंधार्‍यातला गाळ काढण्याचे काम १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी सुरू करण्यात आले. 
भारतीय जैन संघटनेने यासाठी मोफत पोकलॅन मशिन उपलब्ध करून दिले. आपल्या कार्यकाळात मराठवाडा पाणी परिषदेचे आयोजन करणारे तथा नेहमी नदीच्या संवर्धनासाठी पुढाकार घेणारे राज्याचे अप्पर पोलिस महासंचालक डॉ. रविंदरकुमार सिंगल यांनी मोती नदीचे सदिच्छादूत म्हणून वेगवेगळ्या समाजसेवी संघटनांची मोट बांधून दिली. त्या प्रयत्नातूनच सुमारे सत्तावन हजार वर्गमिटर असे माठे क्षेत्रफळ लाभलेल्या कुसमाडी वनबंधार्‍यातला गाळ काढण्याचे काम सुरू झाले. पोकलॅन यंत्र मिळाल्यानंतर त्याच्या डिजेलचे तसेच गाळ वाहून नेण्यासाठी लागणार्‍या ट्रॅक्टर्सचा खर्च दानशुरांच्या मदतीने गोळा करण्याची मोहिम सुरू झाली. त्यातून अवघ्या आठवड्याभरात बंधार्‍याची पाणी धारण करण्याची क्षमता एकावन्न लाख लिटर्सनी वाढली आहे. ''अंकाई डोंगररांगेचा हा परिसर कोणे एके काळी वनसंपन्न होता. इथले डोंगर आता ओकेबोके झाले आहेत. या डोंगरात मोती नदीचा पाणलोट विकास झाला तर या परिसरात पुन्हा सुबत्ता येईल हे ओळखून मोती गारदा संवर्धन प्रकल्पाची मूहूर्तमेढ रोवण्यात आली. कुसमाडी वनबंधार्‍याच्या धर्तीवर या परिसरातील विविध गांवांमधली वनतळी, तसेच गाव बंधारे दुरूस्त तथा गाळमुक्त करण्याचा मानस आहे. त्यासाठी ग्रमस्थांनी पुढाकार घेणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन मोती नदीचे सदिच्छादूत डॉ. रविंदरकुमार सिंगल यांनी केले. 
सकाळच्या सत्रात बीजेएसचे सदस्य तसेच नासिकहून आलेल्या काही स्वयंसेवी संघटनांच्या प्रतिनिधींनी कुसमाडी वनतळ्याला भेट देऊन तिथे गाळ काढण्याच्या कामाची पाहणी केली. बंधार्‍यातून काढला जाणारा गाळ बंधार्‍याच्याच भोवताली वर्तुळाकार पद्धतीने टाकला जात असून तो दाबून घेतला जात आहे. बंधार्‍याच्या पाण्यात तो मिसळणार नाही अशी ही रचना केली जात असून त्यातून बंधार्‍या भोवती पदमार्ग तयार केला जात आहे. त्यावर देखिल झाडे लाऊन हा परिसर शोभिवंत शोभिवंत करण्यात येणार आहे.  
वनबंधार्‍याच्या कामाची पाहणी केल्यानंतर कुसमाडीतल्या मारूती मंदिरात ग्रामस्थांशी संवाद साधण्यात आला, त्या प्रसंगी मार्गदर्शन करताना श्री. सिंगल बोलत होते. पाण्याचे संवर्धन हे शास्वत पद्धतीने होण्याची आवश्यकता असून त्यासाठी येणार्‍या काळात वेगवेगळ्या योजना अंमलात आणल्या जातील, कुसमाडी वनतळे ही त्याची केवळ एक सुरूवात आहे, परंत या एका सुरूवातीने या भागातले चित्र पालटू शकेल, एवढे काम आता सुरू झाले आहे. पाण्याच्या कामा सोबत पर्यावरण, कुषी विकास, क्रीडा व सांस्कृतिक विकासाच्या योजना आहेत. पहिल्या पाच गावात लगेचच वाचनालय सुरू करण्याचा मान डॉ. सिंगल यांनी व्यक्त केला. ग्रामस्थांच्या मनात चैतन्य निर्माण करणार्‍या या वक्तव्यास उपस्थितांनी उभे राहून दाद दिली. 
आपल्या प्रास्ताविकात मोदी नदीचे प्रहरी प्रशांत परदेशी यांनी पाणलोट विकास प्रकल्पाचा आढावा घेतला, या परिसरात विकासाच्या वेगवेगळ्या संधी पर्याप्त असल्याकडे निर्देश करताना इथल्या प्रत्येक छतावर पडणार्‍या पावसाच्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाची पाण्याच्या बॅंकेत साठवणूक करण्याचे उद्दीष्ट सरपंच मोहन बारहाते यांच्या रूपाना गावासमोर ठेवले. 
बीजेएसचे राज्य अध्यक्ष नंदकूमार साखला यांनी भारतीय जैन संघाच्या जलसंवर्धनाच्या संपुर्ण राष्ट्रीय योजनांची थोडक्यात माहिती सांगताना स्थानिक जनते्य अनन्यसाधारण सहभागाची निकड व्यक्त केली. पाण्याच्या सोबतच पर्यावरणाच्या प्रत्येक घटकावर या योजने अंतर्गत काम केले जाणार असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच बीजेएस आणखी मदत करण्यास उत्सूक असून तशा योजना तयार करण्याचे त्यांनी आवाहन केले. या प्रसंगी सह उपवन संरक्षक डॉ. सूजित नेवसे, बीजेएसचे राज्य सचिव दीपक चोपडा, जिल्हा प्रमुख संदीप कटारिया, विभागीय अध्यक्ष ललित सुराणा, सचिव राशन टाटीया, उपाध्यक्ष प्रशांत छाजेड, येवला तालुक्याचे अध्यक्ष विजय श्रीश्रीमाळ, सतिष समदडिया, येवल्यातील जलक्रीडा विद्यालयचा संकल्पक धवल पटेल, स्टार प्रवाहवरच्या अबोली माहिकेची अभिनेत्री स्मीता प्रभू, नासिकमधल्या स्वयंसेवी संस्थांचे संगठन करणार्‍या ज्योती वाघचौरे, आर्किटेक्ट शीतल सानवणे, मोती नदीच्या तिरावरील विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, नदी समन्वयक, कुसमाडीतलले ज्येष्ठ नागरिक  आदी मान्यवर उपस्थित होते. आभार प्रदर्शन नदी प्रहरी मनोज साठे यांनी केले. या नंतर सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत मान्यवरांनी स्नेहभोजनाचा मारूती मंदिराच्या परिसरातच अस्वाद घेतला.

थोडे नवीन जरा जुने