छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून.... जिल्हा नियोजन समितीतून येवला नगरपरिषदेला अग्निशमन वाहन खरेदीसाठी ७६ लक्षचा निधी मंजूर

छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून....

जिल्हा नियोजन समितीतून येवला नगरपरिषदेला अग्निशमन वाहन खरेदीसाठी ७६ लक्षचा निधी मंजूर

येवला  :- पुढारी वृत्तसेवा



राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून येवला परिषदेला अग्निशमन वाहन खरेदी करण्यासाठी जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमातून ७६ लक्ष निधीस मंजुरी मिळाली आहे. यामुळे येवला शहरातील आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी व शहराच्या सुरक्षितेसाठी मदत होणार आहे.

येवला नगरपरिषदेकडे सद्यस्थितीत उपलब्ध असलेले अग्निशमन वाहन हे १७ वर्ष जुने झालेले आहे. त्यामुळे ते वारंवार नादुरुस्त होत होते. येवला नगरपरिषद ही ब वर्ग नगरपरिषद असून नगरपरिषदेची लोकसंख्या जवळपास ७० हजार आहे. येवला शहरामध्ये १६ ते १७ हजार घरांची संख्या आहे व ५०० पैठणीचे दुकाने आहे. तसेच १५ पेट्रोल पंप, ४ गॅस एजन्सीज् आहेत आणि त्यांच्या टाक्यांचा साठा देखील येवला शहरामध्ये आहे.  येवला शहर हे सेनापती तात्या टोपे यांची जन्मभूमी असून या ठिकाणी त्यांचे भव्य दिव्य स्मारक उभारण्यात आलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील धर्मातराची घोषणा येवला शहरात मुक्तिभूमी येथे केलेली असून त्याठिकाणी भव्य स्मारक उभारण्यात आलेले आहे. त्यामुळे येवला शहरामध्ये लाखो पर्यटक भेटी देण्यासाठी येत असतात. 

तसेच शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चाललेला असून शहराचे क्षेत्रफळ सुमारे १२.७९ चौ.कि.मी. आहे. त्याचप्रमाणे येवला तालुक्यामध्ये १२४ खेडे समाविष्ठ आहेत तसेच त्यांची एकूण लोकसंख्या सुमारे २.६३ लक्ष इतकी आहे. या भागात आग लागण्याच्या घटना अतिशय मोठ्या प्रमाण घडत आहे. येवला नगरपरिषदेकडे उपलब्ध असलेले अग्निशमन वाहन हे जुने असल्याने ते घटनास्थळी वेळेवर पोहोचु शकत नाही किंवा रस्त्यातच वारंवार नादुरुस्त होत असल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमातून येवला नगरपरिषदेला अग्निशमन वाहनांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु होता. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अग्निशमन वाहन खरेदीसाठी ७६ लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे.
थोडे नवीन जरा जुने