आमदार किशोर दराडे यांनी अधिवेशनात कांदा, द्राक्ष भावासह पेन्शन योजनेसह शिक्षक भरती,विजेप्रश्नी वेधले लक्ष
येवला : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कांदा व द्राक्ष हे प्रमुख पीक आहे.लाखो रुपये भांडवल शेतकरी गुंतून हे पिके घेतात.मात्र अस्मानी सुलतानी संकटासह बाजारभावामुळे प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भूृदंड सहन करावा लागत आहे.सध्या तर कांदा पीकासाठी लावलेले भांडवल ही मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.त्यामुळे कांद्याला ५०० ते १००० रुपये क्विंटल मागे अनुदान द्यावे तसेच हमीभाव जाहीर करावा अशी मागणी करून कांदा व द्राक्षाच्या भावाप्रश्नी शासनाने कायमस्वरूपी धोरण निश्चित करावे अशी मागणी आमदार किशोर दराडे यांनी विधान परिषदेत केली.
मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानपरिषदेत आमदार दराडे यांनी राज्यपालाच्या अभिभाषणावर अभिप्राय देताना मनोगत व्यक्त करत विविध प्रश्नी सभागृहाचे लक्ष वेधले.जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने मेटाकुटीला आला आहे.अनेक शेतकऱ्यांना तर पीक घेण्यासाठी लावलेले भांडवल दूरच पण खिशातून पैसे टाकून कांदा विक्रीला नेलेल्या वाहनाचे भाडे देण्याची वेळ आली आहे.दोन रुपयाचे धनादेश शेतकऱ्यांच्या हातात पडतात ही त्याची चेष्टाच आहे.जिल्हाभर कांद्याच्या पडलेल्या भावा प्रश्न शेतकरी आक्रमक होऊन रस्त्यावर उतरत आहेत.शेतकऱ्यांच्या संतापाची भावना लक्षात घेऊन आमदार दराडे यांनी कांदा,द्राक्ष प्रश्नी धोरण निश्चित करून शेतकऱ्यांचे दरवर्षीच होणारी फरपट थांबवण्याची मागणी केली.यावर्षी अल्प दराने विक्री केलेल्या कांद्याला प्रतिक्विंटल कमीत कमी पाचशे रुपये ते हजार रुपये अनुदान द्यावे अशी मागणी त्यांनी केली.द्राक्ष उत्पादक शेतकरी देखील हवामानाच्या लहरीपणामुळे,गारपिटीमुळे तसेच व्यापाऱ्यांच्या फसवणुकीच्या घटनामुळे त्रस्त झाला असून आर्थिक फटका सहन करत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी शासनाने धोरण निश्चित करून द्राक्ष उत्पादक शेतकरी व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली.शेतकऱ्यांना शेतीसाठी फक्त दिवसाच वीजपुरवठा होत आहे परिणामी रात्ररात्र जीव धोक्यात घालून पिकांना पाणी देण्याची वेळ येत असल्याने दिवसा वीज मिळावी यासाठी सौर पंपासाठी १०० टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात यावे ही मागणी आमदार दराडे यांनी सांगितले.
ग्रामीण भागात रिक्त शिक्षक पदांमुळे शिक्षणाची हेळसांड सुरू आहे.काही शाळांवर तर तीन अन चार शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे तसेच अनेक वर्षापासून क्रीडा शिक्षकांची पदे भरली नसल्याने विद्यार्थी क्रीडांगणापासून दुरावत चालला आहे.बुद्धीमत्तेबरोबर शाररिक विकास तेवढाच महत्वाचा आहे.शिक्षक नसल्याने विध्यार्थी आपल्या कला व क्रीडा गुणांना वाव देऊ शकत नाही.त्यामूळे
शाळा स्तरावर खेळाचे गरज असल्याने क्रीडा शिक्षकासह इतर सर्व विषय शिक्षकांच्या जागा तत्काळ भराव्यात व विद्यार्थ्यांचे नुकसान थांबवावे तसेच शाळा चालवण्यासाठी अत्यावश्य घटक असलेले लिपिक व शिपाई पदाची ही भरती शासनाने करावी अशी आग्रही मागणी दराडे यांनी केली.
शिक्षकाचे सुरुवातीचे दहा-बारा वर्ष विनाअनुदानित सेवेत जातात त्यानंतर सेवानिवृत्ती झाल्यावर त्याला आयुष्याच्या शेवटासाठी पेन्शनच्या काठीचा आधार आवश्यक असतो.मात्र जुनी पेन्शन योजना बंद केल्यामुळे शिक्षकासह सर्वच कर्मचारी आपल्या भविष्याप्रश्नी चिंताग्रस्त आहे. शासन पेन्शनसाठी सकारात्मक असल्याचे सांगितले जाते मात्र कालमर्यादा निश्चित करून जुन्या पेन्शन योजना लागू करण्यासाठी शासनाने ठोस निर्णय घ्यावा व शिक्षकांसह नोकरदारांना आधार द्यावा अशी मागणीही आमदार दराडे यांनी केली.आपण निश्चित या प्रकरणी पाठपुरावा करून लढा देऊ असा विश्वास दराडे यांनी व्यक्त केला.
शासनाने शिक्षण सेवकाच्या मानधनात वाढ केल्याबद्दल तसेच २० व ४० टक्के अनुदानासाठी भरीव निधीची तरतूद केल्याबद्दल त्यांनी शासनाचे आभार मानले. तसेच नुकत्याच घोषित केलेल्या २० व ४० टक्के अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शाळा व शिक्षकांना अनेक जाचक अटी व निकष लावले आहे.या अटी शिथिल कराव्यात व जाहीर केलेले अनुदान लवकरात लवकर वितरित करावेत अशी मागणी देखील यावेळी त्यानी केली.