बाभूळगाव कृषि विद्यालयाच्या २३ वर्षातील मित्रांचा आगळावेगळा स्नेहमेळावा!
येवला - पुढारी वृत्तसेवा
येवला व बाभुळगाव येथील कृषी विद्यालयातून कृषी विषयक अभ्यासक्रमाची पदविका घेऊन सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत.मात्र आपल्या आपले मित्र एकत्रित येऊन त्यांनी शेती संदर्भात मार्गदर्शन करावे व शेतकऱ्यांना आधार द्यावा या हेतूने २२ वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा आगळावेगळा स्नेह मेळावा संपन्न झाला.
येवला व बाभूळगाव कृषि विद्यालयातील सर्व कृषि मित्र नोकरी,उद्योग,व्यवसाय यात यशस्वी होत असताना त्यासोबत या कृषि प्रधान देशाचे सुजाण नागरिक या नात्याने आपण आपले अनुभव,शेती क्षेत्रातील समस्या,त्यावरील उपाय,शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञान,कृषि क्षेत्रातील निर्यात संधी,समूह शेती व व्यवसाय,शेती पूरक उद्योग,व्यवसाय याबाबत सखोल चर्चा व मार्गदर्शना साठी नैताळे येथे आयोजित कृषि सोहळ्यास सन 2000 पासून आतापर्यंत सर्व कृषि मित्र उपस्थित होते.
यावेळी विद्यालयातील शिक्षक विजय धात्रक,रमेश कदम,विक्रम काजळे पाटील, ज्ञानदेव अडसुरे, अनिल तुपे,गणेश मोढे,लहानेस्वर पुणे,दत्ता पाटील,दत्तात्रय वैद्य,देवचंद शिंदे उपस्थित होते.
कार्यक्रमात प्रथमता सर्व मयत कृषि मित्रांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यानंतर आयोजकांनी कार्यक्रम आयोजनाचा उद्देश स्पष्ट करून सांगितला व सर्व कृषिमित्रांची ओळख परेड करून,गुरुजनांचा सत्कार करण्यात आला.
यानंतर विद्यालयातील यशस्वी यशोगाथा असलेल्या मित्रांनी आपली मनोगते व्यक्त केली.जिद्द,चिकाटी,मेहनत व प्रामाणिकपणे काम केल्यास यशाचा सुगंध कोणीच हिरावु शकत नाही पण हे होतांना आपले वाईट काळातील मित्र व जगाचा पोशिंदा बळीराजा यांना शेवटपर्यंत विसरू नये असे उद्गार यावेळी कृषि मित्र उदय गोळेसर यांनी मांडले. तसेच या पृथ्वीवर जन्माला आल्यावर जसे ईश्वराचे उपकार आहेत तसेच आपले दायित्व म्हणुन पर्यावरण रक्षण व संवर्धन,बेटी बचाओ,स्री भ्रूण हत्या,सेंद्रीय शेती यासारख्या गोष्टीला प्राधान्य देण्याचे आवाहनही विजय भोरकडे यांनी केले.यावेळी प्रविण सूरसे,भास्कर आव्हाड,शीतल गोसावी,विनोद पवार,सुधाकर आहेर,सुहास दाभाडे,संदीप मेमाने,नीलेश साबळे,भूषण कदम,अजित गीते,कृष्णा बिडगर,गोरख निंबाळकर,प्रविण सायाळेकर,किरण पातळे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
यानंतर मार्गदर्शन करतांना ज्ञानदेव अडसुरे यांनी शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान व पूरक उद्योग व्यवसाय,रमेश कदम यांनी सेंद्रीय शेती व शेत माल विपणन बाबत,दत्तात्रय वैद्य यांनी कृषि मित्र व सामाजिक बांधिलकी,विक्रम काजळे पाटील यांनी नोकरी व उद्योगापलीकडे जागतिक कृषि बाजारपेठ मागणी संधी,गुणवत्ता पूर्ण उत्पादन,त्याबाबची सविस्तर माहिती दिली तर विजय धात्रक यांनी यापुढे कृषि मित्र ही आधुनिक शेतीसाठी मार्गदर्शक चळवळ म्हणुन अधिक जोमाने कार्य करण्यासाठी ट्रस्ट स्थापन करून कार्य विस्तार वाढविण्याचा मानस व्यक्त केला.
यानंतर सर्व कृषि मित्रांनी करमणुकीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला.
देवचंद शिंदे यांनी या कृषि मित्र सोहळ्यासाठी जिल्हाभरातून आलेल्या सर्व मित्रांनी यासाठी आपला बहुमूल्य वेळ दिला,आपल्या विचारांची देवाणघेवाण करून,सशक्त कृषि प्रधान देशासाठी वैचारिक कार्यशाळेत सहभागी झाल्याबद्दल,कार्यक्रमाची शोभा वाढविली व कार्यक्रम अतिशय शांततेत व सुरळीत पार पाडण्यास सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार मानून 'भेटत राहू 'या अभिवचनासह या आनंदी सोहळ्याची सांगता झाली.