विद्यार्थ्यांसाठी पिंपळगाव जलाल - बोकटा जादा व वेळेत बस सोडणेची येवल्यात काँग्रेस पक्षाची मागणी
येवला : पुढारी वृत्तसेवा
येवला तालुका व शहर काँग्रेस कमिटी तर्फे विद्यार्थ्यांच्या बस बाबतील समस्यांबाबत येवला आगार प्रभारी स्थानक प्रमुख विकास वाहुळ यांना निवेदन देण्यात आले.
येवला आगाराची पिंपळगाव जलाल, उंदीरवाडी, बोकटा ही बस सकाळी बोकटा येथुन दुगलगाव, देवाळणे, उंदीरवाडी, पिंपळगाव जलाल या विविध गावातील विद्यार्थ्यांना घेवून येवला बस स्थानक येथे येते. त्यानंतर दुपारी एक वाजता येवला येथून पुन्हा प्रवाशांना व विद्यार्थ्यांना घेवून उंदीरवाडी, पिंपळगाव जलाल येथे जाते. परंतु सदर मार्गावर बरीच गावे असुन विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे एक बस प्रवाशी व विद्यार्थ्यांसाठी अपुरी पडते. बस मध्ये विद्यार्थ्यांना बसण्यास जागा मिळत नाही, बस पूर्ण भरल्यामुळे बरेच विद्यार्थी बस मध्ये बसू शकत नाही तसेच बस मध्ये बसताना गर्दी असल्यामुळे अपघातही होतात. त्यामुळे अतिरिक्त एक बस सदर मार्गावर सुरू करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
त्याचबरोबर दुपारी एक वाजता येवला बस स्थानक येथून पिंपळगाव जलाल, उंदीरवाडी, बोकटा येथे जाणारी बस ही वेळेत सोडावी. दररोज बस सोडण्यास उशीर होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरी जाण्यास उशीर होतो. जेवण वेळेत मिळत नाही, अभ्यासला वेळ मिळत नाही त्यामुळे शैक्षणिक नुकसान होते.
त्यामुळे पिंपळगाव जलाल - बोकटा साठी जादा बस सुरू करावी व बस वेळेत सोडाव्यात या व ईतर मागण्यांबाबत आज येवला तालुका व शहर काँग्रेस कमिटीतर्फे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या येवला आगार प्रभारी स्थानक प्रमुख विकास वाहुळ यांना निवेदन देऊन विद्यार्थ्यांच्या समस्यांचा पाढा वाचण्यात आला. सदर निवेदनाची दखल घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड.समीर देशमुख, शहराध्यक्ष प्रीतम पटणी, शहर कार्याध्यक्ष सुरेश गोधंळी, तालुका कार्याध्यक्ष सुखदेव मढवई, तालुका संघटक अण्णासाहेब पवार, ॲड. विठ्ठल नाजगड, एन.एस.यु.आय. तालुकाध्यक्ष अक्षय शिंदे, गौरव खुटे, विवेक भोरकडे, आदित्य भोरकडे, दिपक ढिकले, सिद्धार्थ वाघ, अभिषेक पगारे, सुरेखा बनकर, सोनाली शिंदे, निकिता गुंजाळ, सुहानी वाघ, कोमल वाघ, साक्षी पगारे, रेणुका धिवर,वंदना वाघ, कल्याणी मोरे, मुक्ता खोकले, अश्विनी मोरे, निकिता काळे आदीसह असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.