येवला शहर पोलिसांची नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई तब्बल 1 लाख 20 हजारांचा नायलॉन मांजा जप्त
येवला : पुढारी वृत्तसेवा
आगामी संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर येवला शहर पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील पहिली धडाकेबाज कारवाई केली आहे . संक्रांत उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना येवला शहरातून तब्बल एक लाख वीस हजार रुपयांचा जीवघेणा नायलॉन मांजा जप्त केला आहे.
नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी नाशिक जिल्ह्यात संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजाच्या वापराबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार येवला शहर पोलिस शहरातील व परिसरातील नायलॉन मांजा विक्रेत्यांवर आपली नजर ठेवून होते .
येवला या शहरात राज्यातील सर्वाधिक मोठा पतंग महोत्सव साजरा केला जातो . पारंपरिक मांजा सोडून तरुणाई आता नायलॉन मांजाकडे वळाली आहे. मात्र या नायलॉन मांजामुळे पशु पक्षांसह निसर्गाची तसेच मानवाची देखील मोठी हानी होत असते , अनेक ठिकाणी नायलॉन मांजामुळे गळा चिरून मृत्युमुखी पडल्याचे घटना नेहमीच असतात .
या कारवाईसाठी शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांचे मार्गदर्शन नुसार
पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे,
पोलीस नाईक मधुकर गेठे, पोलीस नाईक संदीप पगार, पोलीस शिपाई सतीश बागुल, बाबा पवार, यांनी केली असून सादिक रफिक मोमीन या आरोपीच्या ताब्यातून एक लाख वीस हजार रुपयांचा नायलॉन मांजा, पन्नास हजार रुपये किमतीची, मालवाहू रिक्षा, असा एकूण एक लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे नायलॉन मांजा विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर देखील पोलीस कठोर कारवाई करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.