क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले यांना येवल्यात सत्यशोधक संघटनेकडून अभिवादन.
येवला : पुढारी वृत्तसेवा
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना 132 व्या स्मृतिदिनानिमित्त येवल्यात सत्यशोधक संघटनेकडून अभिवादन करण्यात आले. स्त्रीया, शेतकरी, कष्टकरी, दलित व आदिवासी यांच्या गुलामगिरीला थांबविण्यासाठी सत्यशोधक विचारांची चळवळ भारतात उभी करण्याचे महानतम लोककल्याणकारी कार्य महात्मा फुले यांनी केले. तसेच स्त्री-शुद्र-अतिशुद्र यांच्या शिक्षणाची सर्वधर्मसमभावाची पेरणी देखील महात्मा फुले यांनीच केली असे प्रतिपादन यावेळी कॉम्रेड भगवान चित्ते यांनी केले. शेतकऱ्यांचा आसूड, ब्राह्मणाचे कसब, गुलामगिरी अशा अनेक ग्रंथांमधून फुल्यांनी भारतीय समाजाच्या विषमतावादी व मनुवादी विचारधारेला प्रखर विरोध करून त्या विचारांची चिरफाड करून मानवतावादी आधुनिक विचार देशातील जनतेला दिले. भारतातील जाती व्यवस्था व तिच्या वरती आधारलेली गुलामगिरी मोडून काढण्यासाठी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी प्रतिकूल काळात आपला लढा उभा करून तो जिंकला देखील. अशा थोर क्रांतिकारकाला भारतरत्न का मिळत नाही असा सवाल देखील यावेळी विचारला गेला. शिक्षणाची गंगोत्री भारताच्या गोरगरीब व समाज व्यवस्थेने नाडलेल्या स्त्रियांपर्यंत नेण्याचे महान कार्य फुले दांपत्यांनी केले पण आज मात्र देशात शिक्षणाचे आणि राष्ट्रीय संपत्तीचे खाजगीकरण, भांडवलीकरण व ब्राह्मणीकरण करण्याचा सपाटा सध्याच्या सरकारने लावला आहे. गरीब जनतेला शिक्षणापासून वंचित केले जात आहे. डिजिटल क्रांतीमुळे बहुसंख्य लोकांच्या हातात मोबाईल आला आहे. मात्र याच ४जी -५जी मोबाईल मुळेच गोरगरीब बहुजनांना अशिक्षित ठेवण्यासाठी, मूळ प्रश्नापासून दूर नेण्यासाठी, त्यांचा बौद्धिक विकास होऊ नये यासाठी डेटा दिला जातो परंतु आट्यापासून (रोजगाराचा हक्क पासून) दूर नेले जात आहे. भांडवलदारी व्यवस्था सरकारच्या नियंत्रणाखाली हे विष पसरवण्याचे काम करत आहे. त्यामुळे या विरुद्ध लढा उभारण्यासाठी फुल्यांच्या सत्यशोधक विचारांचे प्रबोधन करण्याचे कार्य आजच्या तरुण पिढीने करणे गरजेचे आहे. मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया ही दुधारी तलवार असून तिचा उपयोग लोक विकासाकरता होणे गरजेचे असल्याचे मत नितीन संसारे यांनी मांडले. याप्रसंगी रज्जाक पठाण मामू, योगेंद्र वाघ, संकेत जाधव, मेजर सचिन साठे, संजय पवार, अरविंद संसारे, चहाबाई अस्वले, इंदुबाई पगारे, लहाणु त्रिभुवन, बाबूलाल पडवळ, किशोर पवार, राजू मिस्त्री, धनंजय वाणी, सचिन कसबे, आकाश पडवळ, संजय गायकवाड, संदीप खरात, कॉम्रेड जितेंद्र गायकवाड, रामभाऊ जोगदंड, अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.