भुजबळ यांच्या संपर्क कार्यालय समोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी केले सरस्वती मातेचे पूजन
येवला : पुढारी वृत्तसेवा
भारतीय जनता पार्टी येवला शहर व तालुका यांच्या वतीने माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या येवल्यातील संपर्क कार्यालय समोर सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.
नुकत्याच झालेल्या समता परिषदेच्या मेळाव्यामध्ये माजी भुजबळ यांनी शाळा महाविद्यालयांमध्ये सरस्वती मातेचा फोटो लावण्यापेक्षा महापुरुषांचे फोटो लावा, त्यांनाच आपले देवता माना जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याची प्रेरणा मिळेल असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या असून याचा गांधीगिरी पद्धतीने निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी येवल्यातील संपर्क कार्यालय या ठिकाणी सरस्वती मातेचे पूजन करून नारळ फोडले . या ठिकाणी या आंदोलनाची पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी मोठा फौज फाटा संपर्क कार्यालयाचे समोर तैनात केला होता.
या आंदोलना प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिंदे, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष समीर समदडिया ,तालुका अध्यक्ष डॉ नंदकिशोर शिंदे, ओबीसी मोर्चाचे राजूसिंग परदेशी,सुधाकर पाटोळे,संतोष काटे, चेतन धसे दिनेश परदेशी, निलेश परदेशी, तात्या मोहरे, वैभव खेरूड, सुभाष काळे,बंटी भावसार आदी सहभागी होते.