'हर घर तिरंगा' अंतर्गत येवला नगरपरिषदेची प्रभातफेरी
येवला : पुढारी वृत्तसेवा
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव " अंतर्गत 'हर घर तिरंगा' या उपक्रमाचा प्रचार व प्रसार करण्याकरिता येवला नगरपरिषदेने दि. 12 ऑगस्ट रोजी शहरातुन प्रभातफेरी काढली. नगरपालिकेचे सर्व कर्मचारी, अधिकारी, बचत गटाच्या महिला, अंगणवाडी सेविका यांचा समावेश असलेली प्रभातफेरीची सुरुवात सकाळी 8.00 वाजता शहरातील गंगा दरवाजा भागात नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांच्या उपस्थितीत झाली. तद्नंतर आझाद चौक, टिळक मैदान, मेन रोड, खांबेकर खुंट, फत्तेबुरुज नाका या भागातुन प्रभातफेरी मार्गक्रमित झाली. शेवटी हुतात्मा स्मारक येथे प्रभातफेरीचा समारोप झाला. यावेळी सहभागी झालेल्या प्रत्येकाने देशभक्तीपर घोषणा उस्फुर्तपणे दिल्या.
केंद्र शासनाचा 'हर घर तिरंगा' हा उपक्रम राज्यात दिनांक 13 ऑगस्ट, 2022 ते दिनांक 15 ऑगस्ट, 2022 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. तरी हा उपक्रम येवला शहरात यशस्वी करण्यासाठी नगरपरिषदेने जनजागृती मोहिम हाती घेतली आहे. याअंतर्गत सदर मोहिमेचे माहितीपत्रके घंटागाडीद्वारे नागरिकांना वाटण्यात येत असुन या उपक्रमाची ध्वनिफीत व जिंगल घंटागाडीवर लावण्यात आली आहे. नागरिकांना राष्ट्रध्वज सहज उपलब्ध होण्याकरिता नगरपालिका कार्यालयात स्टॉल लावण्यात आला आहे.
दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान शहरातील प्रत्येक नागरिकाने घरावर झेंडा फडकवुन राष्ट्रप्रेम व्यक्त करण्याचे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी केले. तसेच राष्ट्रध्वज फडकविताना भारतीय ध्वज संहितेचे पालन होणे व जाणते-अजाणतेपणी राष्ट्रध्वजाचा अवमान होवु नये याची दक्षता घेण्याबाबत शहरवासियांना नम्र आवाहन केले आहे.