बंधाऱ्यात बुडून 2 युवकांचा दुर्दैवी मृत्यू
येवला : पुढारी वृत्तसेवा
येवला तालुक्यातील रायते शिवारात अगस्ती नदीवरील बंधाऱ्यांमध्ये दोन महाविद्यालयीन तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास शेजारील भाटगाव येथील रहिवासी दीपक मिटके वय 18 हा त्याच्या येथे मांडवड ता. नांदगाव येथून शिक्षणासाठी आलेल्या आते भाऊ तुषार उगले वय 20 याच्याबरोबर पोहण्यासाठी या बंधाऱ्यात आले असता त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी अथक प्रयत्न करून यांना बाहेर काढले . येवला शहर पोलिसांनी या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली असून अधिक तपास येवला शहर पोलीस करीत आहेत.