अनंत अडचणी...निवड श्रेणीचे प्रशिक्षण ऑफलाईन घेण्याची आमदार दराडेकडे शिक्षकांची मागणी

अनंत अडचणी...निवड श्रेणीचे प्रशिक्षण ऑफलाईन घेण्याची आमदार दराडेकडे शिक्षकांची मागणी

येवला : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील माध्यमिक शिक्षकांचे वरिष्ठ व निवड श्रेणीचे ऑनलाईन सुरू असलेल्या प्रशिक्षणाला सर्वर प्रॉब्लेमचा अडथळा येत आहे.ज्येष्ठ शिक्षकांना ऑनलाइन समजून घेण्यालाही अडचणी येत असून काही ठिकाणी इंटरनेट नसल्याने या प्रशिक्षणाचा फटका शिक्षकांना बसणार आहे.त्यामुळे सदरचे प्रशिक्षण त्वरित रद्द करून ते सुट्टीमध्ये ऑफलाइन पद्धतीने घ्यावेत अशी मागणी येथील शिक्षक नेत्यांनी शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्याकडे केली आहे.
नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांची भेट घेऊन तालुक्याच्या वतीने वरिष्ठ व निवड श्रेणीचे ऑनलाईन प्रशिक्षनातील अडचणीं सांगितल्या.तसेच ऑफलाइन प्रशिक्षण घेण्याच्या मागणीचे निवेदन दिले.साधारण डिसेंबरमध्ये वरिष्ठ व निवड श्रेणी पात्र शिक्षकांची नोंदणी झाली असून प्रत्येकी २ हजार रुपये ऑनलाईन शुल्क शिक्षकांनी भरले आहे.राज्यभरातून ९५ हजार ४११ शिक्षकांनी नोंदणी केली आहे.१ जूनपासून प्रशिक्षण सुरू होणार असा गाजावाजा झाला.अधिकृत लिंक वर जाऊन प्रशिक्षण साधारण ५ हजार शिक्षकांनी जॉईन केले.नंतर वयक्तिक मेलवर तुरळक प्रमाणात काही शिक्षक बंधूंना युझर आयडी व पासवर्ड आले तर अजून बरेच वंचित आहेत.प्रशिक्षण कालावधी ३० जूनपर्यंत फक्त ६० तास दिलेला आहे.पण जॉईन होतांना नॉट रीचेबल असा संदेश अनेकांना मिळत आहे.असंख्य प्रशिक्षणार्थीचे पासवर्ड लॉगिन न होता इंटरनल सर्व्हर एरर असेच सर्वांना मेसेज आले.
सध्या शाळा सुरू होत असून प्रवेश, अध्ययन-अध्यापनासह शाळेचे काम शिक्षकांना आहे.त्यात पावसाळा सुरू होणार असून नेट प्रॉब्लेममध्ये ऑनलाईन प्रशिक्षण कसे पूर्ण होणार!मे मध्ये सुट्टी असतांना ऑनलाईन प्रशिक्षण का ठेवले नाही? असा सवाल शिक्षकांनी केला आहे.
आता शाळा सुरू होत असताना शासनाने सेतू अभ्यासक्रम व चाचण्या घेण्यास सांगितले.त्यामुळे सदर प्रशिक्षण हे ऑफलाईन पध्दतीने व सुट्टीतच घ्यावे ही जोरदार मागणी यावेळी उपस्थित शिक्षकांनी केली.यावेळी आमदार किशोरभाऊ दराडे यांनी समस्या समजून घेतांना सदर प्रशिक्षण हे शिक्षकांच्या हितासाठी ऑफलाईन पद्धतीने घेण्यासाठी शिक्षण आयुक्त व शिक्षण मंत्री यांच्याकडे तातडीने बैठक घेऊन ऑनलाईन प्रशिक्षण रद्द करून ऑफलाईन प्रशिक्षण साठीमार्ग काढण्यात येईल असे आश्वासित केले. यावेळी शिक्षक नेते सुरेश जोरी,रविंद्र थळकर,दिगंबर नारायणे,विलास आहेर,तुकाराम लहरे,राजेंद्र पाटील,
कल्पना गाडीवान,गंगाधर पवार,देविदास देसले,बाळासाहेब वाबळे,अनिल मुंढे,
संजय देशमुख,नवनाथ साबळे,पोपट शेवाळे,महेंद्र सूर्यवंशी,राजेंद्र नागरे, एस.व्ही.गायकवाड,एफ.बी.चव्हाण आदी शिक्षक यावेळी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने