*दिव्यांगांच्या पंखात बळ पेरुन त्यांना आत्मसन्मान मिळवून देणे हे मानवतावादी कार्य ❗---------*तहसीलदार प्रमोदहिले यांचे प्रतिपादन*
*दिव्यांग दिनी युडीआयडी कार्डचे वाटप*
*येवला( )* समाजात अनेक प्रकाराच्या दिव्यांग व्यक्ती अतिशय वाईट जीवन जगतांना आपण पहात असतो,माञ समता प्रतिष्ठान ही संस्था कर्ण-बधिर दिव्यांगांना शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांच्यामध्ये जो आत्मसन्मान निर्माण करीत आहे, हे मानवतावादी कार्य असल्याचे गौरवोद्गार येवल्याचे तहसीलदार तथा प्रसिद्ध साहित्यिक प्रमोद हिले यांनी येथे बोलतांना व्यक्त केले.
येथील समता प्रतिष्ठान ही संस्था गेल्या २४ वर्षांपासून चालवित असलेल्या मायबोली निवासी कर्ण-बधिर विद्यालयात दर वर्षाप्रमाणे या वर्षीही "जागतिक दिव्यांग दिन" मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा झाला. निमित जाहिर सत्कार आणि तालुक्यातील दिव्यांगाना युडीआयडी कार्डच्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला,त्यावेळी तहसीलदार हिले बोलत होते, समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मारूतीराव पवार होते.
सुरुवातीला दिव्यांगांच्या दिपस्तंभ हेलन केलर आणि भारतातील पहिल्या महिला अध्यापिका साविञीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या " सुंदर ते ध्यान,उभे विटेवरी,कर कटेवरी ठेवूनिया "या लोकप्रिय अभंगावर सुंदर नृत्य सादर करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा अर्जुन कोकाटे यांनी या शाळेची २४ वर्षाची वाटचाल सांगत या मुलांना शाळेत शिक्षणाबरोबरच व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी पैठणी विणकाम, संगणक,फेब्रीकेशन,प्रिटींग,शिलाई काम,आणि सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देण्यात येते,क्रमिक पुस्तकांच्या शिक्षणाबरोबरच या मुलांच्या पुनर्वसनासाठी संस्था आणि शाळा विशेष भर देते .संस्था केवळ मूकबधिर मुलांसाठीच काम करित नसून तालुक्यातील अनेक दिव्यांगांना शासनाच्या विविध योजना व मदत करित असल्याचे स्पष्ट केले.शासनाचा उपक्रम दिव्यांगाना युडीआयडी कार्ड वाटप करणे व मार्गदर्शन करणेबाबत विद्यालयात काम करित करित असलेल्या शिक्षकांचे विशेष कौतुक केले .
याप्रसंगी येवल्यातील सुप्रसिद्ध स्टम्पवेंडर गो.द.कुलकर्णी मामा यांचे नातू आणि प्रा सोनाली व राहूल कुलकर्णी यांचे सुपुत्र प्रसिद्ध पर्यावरण तज्ञ,अत्यंत अल्प वयात ज्यांनीं पर्यावरणासारख्या अत्यंत गंभीर आणि आवश्यक ठरत असलेल्या विषयांत विशेष प्राविण्य मिळवित जगातील अनेक देशातील पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्षांच्या परिषदेत या विषयाचे गांभीर्य लेखी प्रबंध पोहचविण्याचे मोठे काम केलेल्या कुमार वेदांत याचा तहसीलदार प्रमोद हिले,सब रजिस्टर भगवान गायकवाड माजी आमदार मारूतीराव पवार या मान्यवरांच्या हस्ते शाळेचे गौरव चिन्हं,शाल,श्रीफळ देऊन ह्रदय सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलतांना तहसीलदार प्रमोद हिले यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना शाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचार्यांना विशेष धन्यवाद देऊन शाळेबरोबरच शासनाच्या विविध उपक्रमात सहभाग घेऊन निफाड व येवला तालुक्यातील ३५० दिव्यांगाना युडीआयडी कार्डचे मोफत वितरण केल्याबद्दल कौतुकही केले. दिव्यांग मुलांना त्यांच्या आयुष्यात सक्षम बनवून त्यांच्या पायावर उभे करण्याचे हे कार्य केवळ मानवतावादी असल्याचे सांगत हिले यांनी या अत्यंत महत्त्वाच्या कामांबाबत या संस्थेला व शाळेतील मुलांना या कामासाठी सर्व प्रकारची मदत करण्याचा शब्द दिला.यावेळी तहसीलदार हिले यांनी अत्यंत सुरेख शब्दात काव्य रचना करून कुणासाठी काय व्हावे हे सहज सुंदर शब्दांत मांडले,
*कधी कधी आयुष्याची होळी होण्यापेक्षा !*
*भुकेलेल्या पोटासाठी पोळी होणं चांगलं !!*
*गरीबाच्या डोक्यावरची मोळी होणं चांगलं !*
*कधी कधी फकिराची झोळी होणं चांगलं !!*
या वास्तव ओळींना उपस्थितांनी वाहवा करीत दाद दिली.यावेळी आपल्या भावना व्यक्त करतांना कुमार वेदांत यांनी, आपल्यावर कुटूंबाने केलेल्या संस्कारांचा आणि शिस्तीचा आवर्जून उल्लेख केला.मी केवळ आपल्या देशाच्या दृष्टीने नव्हे तर संपूर्ण विश्वासाठी महत्त्वाचे काम एक उत्तम संधी मिळाली समजावून करीत असल्याचे सांगितले.पर्यावरण या समस्येने संपूर्ण जगाला कसा विळखा घातला आहे ते स्पष्ट शब्दात सांगून अद्यापही माणसाने आपल्या दैनंदिन जीवनात बदल केला पाहिजे हे सांगायला देखील ते विसरले नाहीत.
याप्रसंगी वेदांत यांची आई प्रा सोनाली कुलकर्णी यांनी वेदांत या वयात संपूर्ण विश्वाच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी देशोदेशीच्या प्रमुखांच्या काॅन्फरंसमध्ये जाऊन प्रयत्न करतोय हे आम्हा कुलकर्णी परिवाराबरोबरच आपल्या सर्वांसाठीच शुभ वर्तमान असल्याचे मोठ्या आनंदाने सांगितले.
आपल्या मुलाच्या सत्काराने सदगदीत झालेल्या राहुलभाई यांनी वेदांतच्या या गगनचुंबी यशापाठीमागे अनेकांचे सहकार्य असल्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला.
यावेळी तहसीलदार हिले आणि मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते दिव्यांगांना युडीआयडी कार्डचे वाटप करण्यात आले. दिव्यांग दिनाचे औचित्य साधून नाशिक येथील सक्षम या संस्थेच्या पदाधिका-यानी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याबरोबरच येवल्यातील मांडले या दिव्याग व्यक्तीस तीन चाकी सायकलचे वितरणही केले. कोरोनाच्या भय संकटामुळे तब्बल दोन वर्ष बंद असलेली मुक-बधिर शाळा पुन्हा सुरू करता आल्याचा आनंद सर्वांच्याच चेह-यावर दिसत होता.विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबासाहेब कोकाटे यांनी कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण शब्दात सूत्रसंचालन केले. यावेळी सब रजिस्टर भगवान गायकवाड,जेष्ठ उद्योजक अरुण गुजराथी,नाशिक येथील सक्षम या संस्थेचे मुजूमदार आदींनी दिव्यांग दिन व संस्थेविषयी आपल्या भावना व्यक्त करून भविष्यात संस्थेला नेहमी सहकार्य करण्याचे आपल्या भाषणात व्यक्त केले .
कार्यक्रमास उद्योगपती सुशीलभाऊ गुजराथी,आधुनिक शेतीचे प्रेणेते अश्विन पटेल,सक्षम संस्थेचे पदाधिकारी,दिनकर दाणे,सुधाताई पाटील,कृष्णावडे,पंडित मढवाई , रामनाथ पाटील, कानिफनाथ मढवाई,कविता झाल्टे,विद्यार्थ्यांचे पालक ,संस्थेतील कार्यरत शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
शेवटी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक सुखदेव आहेर यांनी उपस्थितीत सर्वांचे आभार मानले, राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.