माणिकपुंजचे पाणी येवल्याला नेणार हा नांदगावकरांचा गैरसमज माणिकपुंज धरणातील पाण्याची येवल्याला आवश्यकता नाही- वसंत पवार

 


माणिकपुंजचे पाणी येवल्याला नेणार हा नांदगावकरांचा गैरसमज

माणिकपुंज धरणातील पाण्याची येवल्याला आवश्यकता नाही- वसंत पवार

 

येवला  :- प्रतिनिधी

 येवल्यातील राजापूर सह ४१ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेसाठी माणिकपुंज धरणातून पाणी वळविण्यास नांदगाव तालुक्यातील नस्तनपूर येथे झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. मुळात येवला तालुक्यातील योजनेसाठी माणिकपुंज धरणातून नव्हे तर नांदूरमध्यमेश्वर धरणातून पाणी देण्याची भुजबळ साहेबांची मागणी असल्याने माणिकपुंज धरणातून पाणी घेण्याचा कुठलाही प्रश्न नाही. त्यामुळे नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी निश्चिंत रहावे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार यांनी व्यक्त केली आहे.

वसंत पवार यांनी म्हटले आहे की, नांदगाव तालुक्याचा दुष्काळ पूर्णपणे संपविण्यासाठी नारपारचे पाणी मनमाड, नांदगावसह दुष्काळी भागाला कसे मिळेल यासाठी भुजबळ साहेब सातत्याने पाठपुरावा करत आहे. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत टप्पा-२ पाणी पुरवठा योजनेमधून येवला विधान सभा क्षेत्रातील राजापूरसह ४१ गावांकरिता नवीन प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तयार करण्यात येत आहे. या गावांना शाश्वत पाणीपुरवठा योजना नसल्यामुळे या गावांना सतत टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागतो. त्यामुळे येथील गावांतील पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी गोदावरी डावा कालव्यातून (नांदूरमध्यमेश्वर) प्रादेशिक पाणी पुरवठा योजना राबविण्यात यावी अशी मागणी भुजबळ साहेबांनी शासनाकडे केली होती आणि ही योजना मंजूर देखील झालेली आहे. त्यामुळे या योजनेसाठी नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज धरणातून पाणी घेण्याचा प्रश्न येत नाही. त्यामुळे नांदगाव तालुक्यातील     शेतक-यांनी निश्चिंत रहावे असे वसंत पवार यांनी म्हटले आहे.

थोडे नवीन जरा जुने